पवारांनी बहुजनांच्या डोक्यावर पुन्हा राजेशाही बसवली; वंचितचा आरोप

Sharad Pawar

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बहुजनांच्या डोक्यावर पुन्हा राजेशाही बसवली आहे. काँग्रेसने केवळ घराणेशाही जपली. आ. पृथ्वीराज चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीवर भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप करतात. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार भाजप उमेदवारांचा प्रचार करतात. त्यामुळे कोण भाजपची ‘बी टीम’ आहे ? असा प्रश्‍न उपस्थित करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवणे, हेच आमचे ध्येय असल्याचे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक पार्थ पोळके यांनी दिले.

वंचित बहुजन आघाडीच्या कराडमधील मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पार्थ पोळके म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीने घराणेशाही जपली आणि बहुजन समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला. आज भाजपही त्याच मार्गावर जात आहे. आमच्या वाट्याचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. त्यासाठी आम्ही लढा उभा करू. तसेच आम्ही राजे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कोणीही समोर आलो तरी घाबरत नाही, हे लक्षात ठेवा, असा इशाराही पार्थ पोळके यांनी यावेळी दिला.

स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांत राज्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वीकारले नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोन चेहरे आहेत. त्यांचा खरा चेहरा सर्वसामान्यांना समजलेला नाही. सत्ताधार्‍यांचे हात रक्ताने लाल झाल्याचा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील – उंडाळकर, ना. डॉ. अतुल भोसले यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर पार्थ पोळके यांनी जोरदार टीका केली. गेल्या ७० वर्षांत केवळ भांडवलशाही आणि घराणेशाही प्रस्थापित करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य वंचितच राहिले आहेत. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आघाडीचा पराभव होतो, हा खोटा प्रचार केला जातो. आजवर वंचितांची मते मिळवून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केल्यानेच ही वेळ आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे, असा प्रचार करतात.

मात्र कराड नगरपालिका निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण नेतृत्व करत असलेल्या आघाडीला बहुमत मिळाले. त्यांच्या आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारास कमी मते मिळाली. असे का झाले ? कोणीही पैसे घेऊन करामत करतो आणि त्याचे खापर वंचित बहुजन आघाडीवर फोडले जाते, असा दावा करत चव्हाण यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मिळालेल्या मताएवढी मते आम्हाला मिळाली होती, हे लक्षात घ्या. त्यामुळेच भाजपची बी टीम कोण , हे पृथ्वीराज चव्हाण यांनीच सांगण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लोकसभा निवडणुकीत ४२ लाखांच्या घरात मते मिळवून वंचित बहुजन आघाडीने ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सहदेव ऐवळे, सचिन माळी, चंद्रकांत खंडाईत, अल्ताफ शिकलगार, अ‍ॅड. संभाजीराव मोहिते, माजी नगरसेवक आनंदराव लादे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सावंत यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.