पवारांना मराठवाड्यातील सामान्यांची काळजी; आमदाराला म्हणाले, अडचणी तात्काळ सोडवा

Sharad Pawar

औरंगाबाद : मराठवाड्यात वाढत असलेली कोरोनाची बिकट परिस्थिती, जनतेच्या अडीअडचणी जाणून घेत त्या तात्काळ सोडवण्यासाठी हवी ती ताकद लावण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला दिल्या. वयाची ८० वर्ष पुर्ण झालेला हा नेता राज्याच्या काळजीसाठी किती धडपडतो हे आज पुन्हा सिद्ध झाले, अशा शब्दात मराठवाडा पदवीधरचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी पवारांसोबत मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीचे वर्णन केले.

राज्यात मुंबई, पुण्यानंतर कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, जालना या जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. वाढती रुग्ण संख्या, मृत्यू दर आणि ऑक्सिजन, रेमडेसिव्हर, बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा या बिकट परिस्थितीचा मराठवाड्याला सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडीत यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. या भेटी विषयी सांगतांना सतीश चव्हाण म्हणाले, शरद पवारांनी आमच्याकडून मराठवाड्यातील कोरोना परिस्थितीची माहिती जाणून घेतली. रुग्ण संख्या, मृत्यू दर आरोग्य सुविधा, उपाय योजना यासह अडीअडचणी याची इत्यंभूत माहिती घेतली. ही माहिती घेत असतांना त्यांच्या चेहऱ्यावर मराठवाड्याबद्दलचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि कोरोना सारख्या महामारीतली चिंता पदोपदी जाणवत होती.

गेल्या महिन्यात पवारांवर दोन शस्त्रक्रिया झाल्या. पण त्या काळातही त्यांना राज्याच्या हिताची काळजी होती. त्यांची भेट घेतली तेव्हा ज्या आस्थेवाईकपणे त्यांनी मराठवाड्यातील कोरोना परिस्थितीची माहिती जाणून घेतली त्यावरून ते कोरोना संकटात किती बारकाईने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत हे दिसून आले. कोरोना संकटात लोकांच्या अडीअडचणी जाणून घ्या, त्या तातडीने सोडवा, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्याचे सतीश चव्हाण यांनी सांगितले. या भेटीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर केलेले दौरे, कोरोना पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने गरजू लोकांना केलेली मदत याची माहिती देखील दिली. माझ्या सोबत अमरसिंह पंडीत देखील होते, असेही सतीश चव्हाण यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button