पवारांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे कौतुक करून आघाडीत समन्वय असल्याचे आज दाखवून दिले

sharad pawar-uddhav thackeray-anil deshmukh

पुणे : दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातचे संमेलन झाले. या कार्यक्रमामुळे देशात कोरोनाचे रुग्ण दुपटीने वाढू लागताच केंद्र आणि दिल्लीतील केजरीवाल सरकारवर विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

मात्र हे सगळे होत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि दिल्लीतील केजरीवाल सरकारवर कुठलीही टीका न करता थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कौतुक करून राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगला समन्वय असल्याचे दाखवून दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाला हरवण्यासाठी काही सूचनाही केल्या. मात्र दिल्ली येथे झालेल्या मरकजच्या कार्यक्रमाबद्दल भाष्य करत चिंता व्यक्त केली.

दिल्लीतील तबलीगच्या कार्यक्रमाला परवानगी द्यायला नको होती. मुळात देशावर कोरोनाचे संकट असताना या संमेलनांसाठी जी परवानगी दिली त्याची आवश्‍यकता नव्हती. महाराष्ट्रातही अशा प्रकारची संमेलने घेण्याचा विचार विविध संघटनांनी केला होता.

गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करून या संमेलनांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येणारे मोठे संकट टळले. हीच खबरदारी दिल्लीत घेतली असती तर एखादा समाज व एखाद्या वर्गाविषयी वेगळे चित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याची परिस्थिती निर्माण झाली नसती- असे म्हणत पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगला समन्वय असल्याचे दाखवून दिले.