‘पवार पॉवर’

'Pawar Power'

Moreshwar Badgeवयाच्या ७८ व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार येत्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरत आहेत. माढा ह्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून पवार उभे राहत आहेत. ज्या वयात पुढारी ‘मार्गदर्शक मंडळा’त जातात त्या वयात पवारांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. २००९ मध्ये पवारांनी याच मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. पण गेल्या वेळी त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आग्रहावरून पवार पुन्हा आखाड्यात उतरत आहेत असे या पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. तरीही या वयात पवारांना निवडणूक का लढवावी लागत आहे हा प्रश्न उरतोच.

ही बातमी पण वाचा : प्रकाश आंबेडकरांच्या अटींपुढे काँग्रेस-राष्ट्रवादीने टेकले हात

माढ्यातील गटबाजीत जागा जाऊ नये यासाठी पवारांनी तिथून उभे राहण्याचा निर्णय केला हा दावाही तितका दमदार वाटत नाही. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या फक्त चार जागा निवडून आल्या होत्या. त्या वेळेला मोदी लाट होती. आता राजकीय हवा बदलल्यामुळे प्रत्येक नेत्याच्या महत्वाकांक्षेला पंख फुटले आहेत. विविध पक्षांच्या नऊ नेत्यांना पंतप्रधान व्हायचे आहे. काँग्रेसच्या जमान्यात पवारांनीही पंतप्रधानांपर्यंत धडक मारली होती. पण उडी कमी पडली. ती कसर पवार भरून काढू पाहत आहेत असे राजकीय विश्लेषकांना वाटते. काहीही असो, पण एका जमान्यात पवारांकडे संशयाने पाहणाऱ्या काँग्रेसला आज त्यांचा आधार घ्यावासा वाटतो ही मोठी गोष्ट आहे. मोदींविरोधातील महाआघाडीच्या महत्वाच्या बैठका पवारांच्या दिल्लीतील घरी होत आहेत. पवारांचे घर म्हणजे महाआघाडीची ‘वॉर रूम’ झाली आहे.

ही बातमी पण वाचा : मुंबईतून ‘संजय निरुपमला हटाव’, काँग्रेस नेत्यांची दिल्लीत पक्षश्रेष्टींकडे मागणी

भाजप बहुमताचे गणित जमवू शकला नाही तर पवारांची लॉटरी लागू शकते. कारण मायावती, ममता, राहुल आदी ‘नवग्रहांना’ काबूत ठेवण्याची कला केवळ पवारांकडे आहे. तसे झाले तर पवारांच्या रूपात ‘मराठी पंतप्रधाना’चे महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला आहे. दोन्ही काँग्रेसचे जागावाटप झाल्यासारखे आहे. भाजप-शिवसेना युतीचा लोच्या मात्र कायम आहे. युतीची गाडी पुढे सरकतेय असे वाटत असताना अचानक ब्रेक लागतो. खुद्द अमित शहा, नितीन गडकरी ‘मातोश्री’ला यायला निघाले अशी हवा असताना माशी शिंकली. आता ‘पीएम तुमचा, सीएम आमचा’ असे पिल्लू शिवसेनेच्या गोटातून आले आहे. विधानसभा निवडणुकीला सहा महिने वेळ आहे. राजकारणात असे सौदे होत नसतात.

राजकारण म्हणजे ‘वन डे’ सामना असतो. प्रकाश आंबेडकरांची १२ जागांची मागणी आणि शिवसेनेची मुख्यमंत्री आमचा ही मागणी यात फरक नाही. कुणाला किती जागा मिळतात याचा कसलाही ठावठिकाणा नसताना पुढचे हिशोब करणे मोदी-शाह जोडीला किती मंजूर असेल हा प्रश्नच आहे. मग प्रश्न पडतो की, युती होणार नाही का? मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा आहे. त्याआधी युतीचा सोक्षमोक्ष लागलेला असेल.

मोरेश्वर बडगे
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार)