परिस्थिती नियंत्रणात आणून सगळं स्थिर करणे हाच पवारांचा पुरुषार्थ – शिवसेना

Sharad Pawar & Uddhav Thackeray

मुंबई : दोन दिवसांपूर्वी पुण्यातील युवा पत्रकार आणि काल माजी महापौरांचा कोरोनामुळे (Corona) झालेल्या मृत्यूने प्रशासन पूर्णतः हादरून गेले. सरकारकडून अनेक उपाययोजना सुरु असताना सुविधा मिळत नसल्याने या दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आता रणांगणात उतरले आहेत. त्यांनी थेट महापालिका गाठून मिळणाऱ्या उपचार सुविधांची माहिती जाणून घेतली. त्यात त्रुट्या आढळून आल्याने अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत काही सूचना केल्या. आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेनं (Shiv Sena) सामानाच्या माध्यमातून शरद पवारांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले आहे.

मागच्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने (Fadnavis Government) आरोग्यविषयक काम केले असते तर आज ज्या तात्पुरत्या सुविधा ‘जम्बो’ म्हणून उभाराव्या लागल्या ते प्रमाण कमी झाले असते. विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर हा जम्बो कोविड केंद्रांवरच आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत, त्यात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करायची असे राजकीय धोरण राज्याच्या गंभीर स्थितीस धोकादायक आहे. पुण्यातील राजकारण्यांनी याचे भान ठेवले तर पांडुरंग रायकर (Pandurang Raikar), दत्ता एकबोटे यांना जे भोगावे लागले ते इतरांच्या नशिबी येणार नाही. असे म्हणत शिवसेनेने विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचेही कान टोचले आहे.

आजचा सामनातील अग्रलेख…

विदर्भातील पूरपरिस्थिती आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक चिंताजनक आहे. मुंबई, ठाण्यातील कोरोनास्थिती नियंत्रणात येत असतानाच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगलीत रुग्णवाढ होत आहे. पुण्यात वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रायकर हे कोरोना पॉझिटिव्ह होते. आधी त्यांनी कोपरगावमध्ये उपचार घेतले, नंतर त्यांना पुण्यात हलवले. पुण्याच्या कोविड सेंटरमधून त्यांना खासगी रुग्णालयात न्यायचे ठरले, पण वेळीच रुग्णवाहिका मिळू शकली नाही व या दिरंगाईत तरुण पत्रकारास प्राण गमवावे लागले. रायकर यांच्या मृत्यूने पत्रकारांत चीड व संताप निर्माण होणे साहजिक आहे. इतक्या ओळखीपाळखी असताना पत्रकार आपल्या सहकाऱ्यास वेळीच मदत करू शकले नाहीत, तिथे इतर सामान्य जनांची काय पत्रास असे बोलले जात आहे व त्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. अर्थात, यानिमित्ताने पत्रकारांनी राज्याच्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढण्याचे मनावर घेतले आहे. पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे हेसुद्धा कोरोनाग्रस्त झाले. त्यांच्या उपचारासाठी पुण्यात एकाही खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध होऊ शकला नाही. ससून इस्पितळात तरी त्यांच्यावर उपचार करा यासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करावे लागले, पण काहीच उपयोग झाला नाही. दत्ता एकबोटे हे कष्टकरी, गोरगरीबांसाठी काम करणारे नेते होते. आतापर्यंत त्यांनी असंख्य गरीबांना उपचारांसाठी मदत केली असेल, पण एकबोटे यांना शेवटच्या क्षणी उपचार मिळाले नाहीत. पुण्यात व आसपास कोरोनाचा कहर आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातच अडीच हजारांवर मृत्यू झाले आहेत व त्या प्रत्येकासाठी अश्रू ढाळण्याची संवेदना आपण ठेवली पाहिजे.

आता खुद्द शरद पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीबाबत दखल घेतली आहे. गुरुवारी त्यांनी अचानक पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पुणे शहरासाठी सहा कार्डियाक ऍम्ब्युलन्स आणि रेमडिसिव्हर इन्जेक्शन्स उपलब्ध करून दिली. शिवाय कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासंदर्भात काही उपयुक्त सूचनाही त्यांनी केल्या. आरोग्यविषयक आणीबाणीच्या स्थितीत दुर्दैवाने अनेक गोष्टी काही काळ नियंत्रणाबाहेर जातात, पण परिस्थितीवर नियंत्रण आणून पुन्हा सगळे स्थिरस्थावर करणे हाच राज्यकर्त्यांचा पुरुषार्थ ठरतो. पुण्यात आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे व सरकार किंवा महानगरपालिका अपयशी ठरत आहे असे रोज बोंबलण्याने काही पक्षांना राजकीय प्रसिद्धी मिळेल, पण अशाने कोरोना काळात जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या यंत्रणांचे खच्चीकरण होत असते. पुण्यातील महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. शहरात भाजपचे आमदार, खासदार आहेत. या सगळ्यांनी शहराच्या सुरक्षेसाठी एकदिलाने काम केले तरच कोरोनाशी नीट लढता येईल. राज्य सरकार, पी.एम.आर.डी.ए., महापालिका यांच्यात समन्वय असायला हवा. मुंबई-ठाण्यात हा समन्वय आहे व त्याचा फायदा झाला. पुण्यात राज्य सरकारतर्फे जम्बो कोविड सेंटर उभे केले. त्यात संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित होण्याआधीच ते सुरू केले, असा आरोप पहिल्या दिवसापासून सुरू आहे. सेंटरचे उद्घाटन घाईघाईने करून घेतल्याची टीका निरर्थक आहे. यापेक्षा मोठी कोविड सेंटर्स मुंबई-ठाण्यात चांगल्या पद्धतीने चालविली जात आहेत. पुण्यातही ती चालविणे हे सगळय़ांचेच कर्तव्य आहे. जे कोरोनाला न घाबरता उपचार करीत आहेत असे डॉक्टर, नर्स, कर्मचारी वर्ग हे राजकीय टीका, संताप यातून निर्माण झालेल्या दहशतीने सेंटरमध्ये थांबायला तयार नाहीत. आधीच कोरोनाच्या वॉर्डात काम करायला कर्मचारी वर्ग मिळत नाही, जे आहेत त्यांची मानसिक शांतता टिकविणे आवश्यक आहे.

वैद्यकीय यंत्रणेवर ताण आहे याचे भान न ठेवता वैद्यकीय यंत्रणा, सुविधा केंद्रच मोडून टाकणे हा प्रकार शेकडो रुग्णांच्या जिवावर बेतू शकेल. फक्त पुणे, मुंबईतच नव्हे तर राज्यातील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आहे. महामारीचा इतका मोठा हल्ला होईल असे कधी कोणाला स्वप्नात तरी वाटले होते काय? सरकारी आरोग्य यंत्रणा या महामारी तुफानाशी लढण्यास कमी पडेल म्हणूनच राज्यभरात तात्पुरत्या स्वरूपात कोविड सेंटर्स उभारण्यात आली. महाराष्ट्रात उभारलेली यंत्रणा देशातील इतर राज्यांच्या तुलनेत नक्कीच कार्यक्षम आणि सरस आहे. महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या अधिक असल्यानेच रुग्णसंख्या मोठी दिसते आहे. इतर राज्यांत तर सगळी लपवाछपवीच सुरू आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या देशात सर्वाधिक दिसत आहे ती याच कारणांमुळे. पेरू देशापेक्षाही महाराष्ट्रात रुग्ण अधिक आहेत, पण पेरूची लोकसंख्या किती याचाही खुलासा जरा होऊ द्या. दुसरे असे की, ग्रामीण भागात अजूनही याबाबत हवी तशी जागरुकता नाही. आजार आधी अंगावर काढायचा किंवा लपवायचा, रुग्ण गंभीर झाला की, त्याला इस्पितळात किंवा शासकीय कोरोना सुविधा केंद्रात न्यायचे. यामुळेच शेवटच्या टप्प्यात उपचारांचा ताण वाढत आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती व सुविधा योग्य वेळी निर्माण केल्या असत्या तर आजची परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आलीच असती. असे म्हणत सरकारच्या कार्याचे समर्थनही शिवसेनेने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER