पवारांनी दिले उद्धव ठाकरेंना अभयदान

badgeमहाविकासआघाडीमध्ये विविध मुद्यांवर मतभेद असले तरी सरकारला धोका नाही. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या मुद्यावर वेगळा सूर लावणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुद्द शरद पवार यांनी अभयदान दिले आहे. ‘सगळ्याच मुद्यांवर सगळ्यांची मते जुळतील असे नाही’ असे सांगून पवारांनी सकारात्मक संदेश दिला आहे. ‘आपण इतकी वर्षे वेगळे का राहिलो?’ असा अजित पवारांना शिव जयंतीच्या कार्यक्रमात प्रश्न करून उद्धव ठाकरे यांनी महाआघाडी भक्कम असल्याचेच सांगितले आहे.

एप्रिलमध्ये राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुका असल्याने महाआघाडीच्या एकीला मोठे महत्व आले आहे. शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचा समावेश असलेल्या महाविकासआघाडीने महाराष्ट्रातून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या सुप्रिमोला पाठवून महाआघाडी भक्कम आणि एकसंघ असल्याचे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. ह्या निवडणुकीत विधानसभेचे आमदार हे मतदार असतात. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात खासदारांची मुदत येत्या एप्रिलमध्ये संपत आहे. त्यात पवार एक आहेत. राष्ट्रवादीचे शरद पवार आणि माजिद मेमन, शिवसेनेचे राजकुमार धूत, काँग्रेसचे हुसेन दलवाई, भाजपचे अमर साबळे आणि संजय काकडे ह्या सात सदस्यांची मुदत संपत आहे. कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विधानपरिषदेच्या २२ जागा पुढील तीन महिन्यात रिकाम्या होत आहेत. एप्रीलमध्ये नऊ जागांसाठी निवडणूक आहे. नंतर राज्यपालांनी १० आमदार नेमायचे आहेत. शिक्षक मतदारसंघातून दोन तर पदवीधर मतदारसंघातून तीन जागा रिकाम्या होत आहेत. निवडणुकांचा हंगाम येत असल्याने राजकीय हालचाली वाढलेल्या दिसणार आहेत. विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या २४ तारखेपासून सुरू होत आहे. अधिवेशन म्हटले की, सरकार बचावाच्या पवित्र्यात जाते. पण महाआघाडीतल्या एकजुटीमुळे प्रथमच सरकार आक्रमक मूडमध्ये दिसत आहे.