न मागताही पवारांनी भरपूर दिले, विधानपरिषदेसाठी खडसेंनी मानले आभार

Sharad Pawar - Eknath Khadse

जळगाव : अखेर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी नावांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. यात राष्ट्रवादीकडून राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने राष्ट्रवादीने त्यांची निवड केली आहे. यावर भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पहिली पतिक्रिया दिली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून माझ्या नावाची शिफारस झाल्याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

न मागताही पवारांनी मला भरपूर दिले. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून माझ्या नावाची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) राज्यपालांकडे केली आहे, याचा मला आनंद आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे मी आभार मानतो, असं खडसे यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसेंसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसकडून इतर 3 जणांना विधान परिषदेवर संधी दिली जाणार आहे. यामध्ये गायक आनंद शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, साहित्यिक, प्रा. यशपाल भिंगे यांचीही नावं जवळपास निश्चित झाली आहेत.

विधानपरिषदेत राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या जागा रिक्त आहेत. या जागांवर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता मागील काही दिवसांपासून लागली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून दिली जाणारी प्रस्तावित 12 आमदारांची नावं समोर आली आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी मिळाली आहे.

दरम्यान, खडसे हे ओबीसी समाजाचे (OBC Community) असून, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ओबीसी समाजावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्याशिवाय खडसे यांचं उत्तर महाराष्ट्रातही मोठं प्राबल्य आहे. त्यामुळे आगामी काळात खडसेंच्या साथीने सहकारी बँकांपासून ते पालिका आणि नगरपरिषदेतील भाजपचं वर्चस्व खंडित करण्यावरही राष्ट्रवादीचा भर असणार आहे. खडसेंना विधान परिषदेत आणल्यास विरोधी पक्षाला नामोहरम करण्यास फायदाच होणार आहे. त्यांना मंत्रिपद दिल्यास त्याचा आणखी फायदा मिळण्याची शक्यता असल्याने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER