पवारांनी महाराष्ट्रात आदर्श सरकार घडवले, विरोधकांनी तसाच प्रयोग करावा – संजय राऊत

Mahavikas Aghadi - Sanjay Raut - Maharashtra Today

मुंबई :- सध्या पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. या राज्यात भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावलेली आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerajee) एकट्या लढताना दिसत आहे. आणि यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षाच्या संयुक्त पुरोगामी आघाडीला मजबूत करण्यासाठी शरद पवारांकडून (Sharad Pawar) बोध घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी राऊत म्हणाले की, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी एकट्या लढत आहेत. सध्या देशात लोकशाही पायदळी तुडवण्याचे पाप केंद्रातील भाजपचे सरकार करत आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपची संपूर्ण ताकद असा सामना रंगला आहे. सध्या ममता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकट्या लढत आहे. आता सर्व विरोधकांनी ममता बॅनर्जी यांना साथ द्यायला हवी. सध्या युपीए भाजपसमोर कुमकुवत ठरत आहे. भाजपला रोखण्यासाठी युपीएला मजबूत करणे आवश्यक झाले आहे. सोनिया गांधी यांनी आतापर्यंत युपीएच नेतृत्व उत्तम प्रकारे केले आहे. मात्र आता त्यांची प्रकृती बरोबर नसल्याने युपीएच नेतृत्व सक्षम नेत्याला सोपवण्याची गरज आहे. सर्व पक्ष एकत्र आल्यास भाजपला रोखणे अवघड होणार नाही, असा दावाही राऊत यांनी केला.

महाराष्ट्राच्या राजकारणाने देशाला नवी दिशा दाखवली आहे. नवा मार्ग दाखवला आहे. राष्ट्रीय स्तरावरही तेच व्हायला हवे. ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्व विरोधकांना एक पत्र लिहिलं आहे. एकूण २७ नेत्यांना त्यांनी पत्रं लिहिलं आहे. देशात नक्की काय होत आहे? असा प्रश्न करतानाच सर्वांनी एकत्र यावर असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्या पत्रावर सर्वांनी विचार केला पाहिजे. एकत्र येणं गरजेचं झालं आहे. सर्वांनी आता एकत्रं आलं पाहिजे. या संदर्भात सर्वांनी एकत्र बसायला हवं. चर्चा करायला हवी. मला वाटतं सर्व एकत्र येतील, असं राऊत म्हणाले.

१९७५ मध्ये आणीबाणीच्या वेळेस जनता पक्ष एकत्र आला होता. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. तेव्हा सुद्धा त्यांना आणण्याचे काम जयप्रकाश नारायण यांच्याकडून करण्यात आले होते. आज कोणीही जयप्रकाश नारायण नाहीत, हे दुर्देव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र विकास आघाडी हा एक प्रयोग देशाच्या राजकारणात झाला आहे. हे संपूर्ण भाजपने शिकावे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे भिन्न विचाराचे पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून सरकार चालवत आहे. हे आदर्श सरकार आहे असं मी मानतो. अशा प्रकारची आघाडी यूपीएकडून करण्यात यावी. ममता बॅनर्जी यांनी जवळ जवळ तशाच प्रकारच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्राने नवी दिशा दाखवली आहे. ते राष्ट्रीय स्तरावर झालं पाहिजे, असं ते म्हणाले.

लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत मी काहीच बोलू शकत नाही. त्याचा निर्णय सरकार घेईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात याबाबत चर्चा सुरू आहे, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लसीकरणाबाबत केंद्र सरकारने महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे. मुंबईही रोजीरोटी आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे. बंगालच्या निवडणुका होतीलच. पण कोरोना वाढतोय. महाराष्ट्राकडे लक्ष देत इतर राज्यातील कोरोना प्रादुर्भावाकडेही लक्ष दिलं पाहिजे. त्या त्या ठिकाणच्या समस्या दूर केल्या पाहिजे. भलेही महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसेल, पण केंद्राने तरीही महाराष्ट्रावर लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रातील प्रजा देशाची नागरिक आहे, हे केंद्राने विसरता कामा नये, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

ही बातमी पण वाचा : पवारांचं काम मोठं, यासाठीच मोदी सरकारने त्यांना पद्मविभूषण दिल – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button