पवारांनी मनावर घेतले तर नाणार होणार ! आणि शिवसेनेची…

Pawar - Nanar - CM Uddhav Thackeray

नागपूर : भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात नाणार येथे रिफायनरी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. त्यानुसार जमिनीच्या अधिग्रहणालाही सुरुवात झाली. कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगून स्थानिकांना आपल्या जमिनी हस्तांतरित करण्यासाठी युती सरकारला मोठे यशही प्राप्त झाले होते. असंख्य जमीन मालकांनी आपल्या जमिनी प्रकल्पाला देण्यास होकार दिला. आणि येथूनच सुरू झाले शिवसेनेचे राजकारण.

काही स्थानिकांना हाताशी धरून शिवसेनेच्या नेत्यांनी प्रकल्पाच्या विरोधात रणशिंग फुंकले. या प्रकल्पामुळे कोकणाचे नैसर्गिक अस्तित्व नाहीसे होईल, असा बोभाटा करून अनेक मोर्चे-आंदोलने करण्याचा सपाटा शिवसेनेच्या नेत्यांनी लावला. एकीकडे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रयत्नशील होते. तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने मात्र आडकाठी आणण्यास सुरुवात केली. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याचा मॅसेज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचवण्यात आला. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजापूर येथे सभा घेऊन स्वतः उद्धव ठाकरे हे आपल्यासोबत चर्चा करतील, असे घोषितही करून टाकले. देसाईंनी केलेल्या घोषणेच्या काही दिवसांनी उद्धव ठाकरे यांनीही रत्नागिरीत येऊन ‘नाणार नाहीच होणार’ घोषित करून टाकले आणि प्रकल्पाच्या पुढील कार्याला ब्रेक लावला.

पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तांतरण झाले आणि खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र त्यांना मुख्यमंत्री बनवण्याची मुख्य भूमिका निभावली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी. महाविकास आघाडीचे कर्ताधर्ता असल्याने शरद पवारांचे वजन आजही महाविकास आघाडीत कायम आहे. सरकारसमोर कुठलीही अडचण असेल तर पवारांचा सल्ला घेण्यात हरकत काय? असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. मात्र सरकारचा जो निर्णय पवारांना आवडला नाही, त्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकली गेली. यावरून महाविकास आघाडी सरकारवर पवारांचा वचक आहे हे दिसते.

आता महाविकास आघाडी सरकार दीड वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. त्याच वेळी नाणारचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना पत्र लिहून नाणारबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती केली. आधी भाजप, त्यानंतर स्थानिकांचे समर्थन आणि राज ठाकरेंनी काल घेतलेल्या भूमिकेने शिवसेनेची कोंडी झाली आहे. प्रकल्पाला सर्वांचे समर्थन मिळत असल्याने शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आधी विरोध केल्यानंतर आता समर्थन कसे द्यायचे, असा यक्षप्रश्न शिवसेनेसमोर उभा ठाकला आहे.

आता महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनीही प्रकल्पाबाबत अनुकूलता दर्शवली आहे. पवारांनी थेट राज ठाकरेंना फोन करून त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. तसेच, याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, असे सांगितले. पवारांनी एकप्रकारे प्रकल्पाच्या उभारणीसाठी हुंकार भरल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

आता शरद पवारांनी नाणारवर लक्ष केंद्रित केल्याने शिवसेनेला बॅकफूटवर यावे लागेल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. शरद पवारांची मागणी असो वा इच्छा, ती पूर्ण करण्यातच महाविकास आघाडी सरकारची भलाई आहे. त्यांचा शब्द डावलणे म्हणजे आघाडी सरकारवर संक्रांत येऊ शकते हे मुख्यमंत्र्यांना चांगले ठाऊक आहे. पवारांनी मनावर घेतले तर नाणार प्रकल्पाच्या धूळ खात असलेल्या फाईल्स पुन्हा उघडल्या जातील यात शंका नाही. नाणार प्रकल्पासाठी ज्या काही अडचणी येतील त्या सोडवल्या जातील. पवारांनी मनावर घेतले तर नाणार होणार हे खरे.

विजय गावंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER