पवारांनी जमवलं, आमदारांनी नासवलं

badgeविधानसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळपास तीन महिने होत आले आहेत. पण दूरदूरपर्यंत सरकारचा पत्ता नाही. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी तीन पक्षांची मोट बांधून सत्तेचे नवे समीकरण जुळवले, महाविकास आघाडीचे सरकार गादीवर आले. पण सरकारला कामाला सुरुवात करता आलेली नाही. सुरुवातीला सत्तास्थापनेचा घोळ चालला. पुढे महिनाभर मंत्रिमंडळ विस्तार रखडला आणि आता चार दिवस झाले. खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. लोकांना हे अपेक्षित नव्हते. शरद पवार ह्या वयात खातेवाटपाच्या मारामाऱ्या पाहण्यासाठी पावसात भिजले नव्हते. पण सध्याचा तमाशा पाहून पवारांची मेहनत फुकट गेली असे दिसते आहे. भाजपला रोखून पवारांनी जे कमावलं ते आमदारांच्या वागण्यामुळे नासलं. भाजपला रोखणे सोपी गोष्ट नव्हती. सत्ता परिवर्तनाचा थरार केव्हाच निघून गेला आहे.

आपसात भांडणाऱ्या नेत्यांकडून जनतेने काय अपेक्षा ठेवायच्या? तीन पक्षांचे सरकार म्हणजे काही मर्यादा येणारच. पण हे कुणीच समजून घ्यायला तयार नाही. मलाईदार खात्यासाठी मारामारी सुरू आहे. कशासाठी हवीत मलाईदार खाती? जनतेच्या कामासाठी की खाण्यासाठी? राष्ट्रवादीचे खातेवाटप शरद पवारांनी करून दिले. त्यामुळे राष्ट्रवादीत फार तणातणी दिसली नाही. मलाईच्या खात्यासाठी काँग्रेसमध्ये प्रचंड रस्सीखेच आहे. महसूल खात्यासाठी दोन माजी मुख्यमंत्री आपसात भिडताना दिसले. चणेफुटाण्याची खाती मिळाली म्हणून शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने गोंधळ घातला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सहनशक्ती मानली पाहिजे. पण दिवसेंदिवस महाविकास आघाडीतील नाराजांचे सैन्य वाढत आहे. आज राज्यमंत्री शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याची हवा उठवली. त्यांना कॅबिनेट पाहिजे. त्यांना समजावण्यात सेनेच्या नेत्यांचा दिवस गेला. सत्तार यांचे बंड शमत नाही तोच जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटीयाल यांनी राजीनाम्याची धमकी दिली. इथे प्रत्येकालाच मंत्रिपद हवे आहे. इतकी मंत्रिपदं कुठून आणायची? कुणा कुणाला समजावणार? ही तर सुरुवात आहे. महाआघाडीत ‘विकास’ शब्द असला तरी वास्तवात सत्तेच्या शितांसाठी सारी भुतं एकत्र आली आहेत. पाच वर्षे स्थिर सरकार देऊ असे उद्धव म्हणत होते. पण अंतर्गत संघर्ष पाहिला तर हे सरकार पाच महिनेही टिकेल असे वाटत नाही.

ते टिकावे अशी कुणाची इच्छाही दिसत नाही. मुख्यमंत्रिपदाचे शिवधनुष्य उद्धव यांनी हाती घेतले खरे; पण ते पेलताना त्यांची दमछाक सुरू आहे. त्यांनी ज्या पद्धतीने मंत्रिमंडळ बनवले, त्यामुळे त्यांच्याच शिवसेनेत नाराजी उफाळून आली आहे. शरद पवारांच्या तालावर नाचत आपण सरकार रेटून नेऊ, असे उद्धव यांना वाटत असेल तर ते मोठी चूक करीत आहेत. ‘मी पुन्हा येईन’ असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांची भविष्यवाणी इतक्या लवकर खरी ठरावी असे सध्याचे राजकीय वातावरण आहे.