
मुंबई : २०१९ साली संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढली. युतीला सत्ता स्थापनेसाठी चांगला जनादेशही मिळाला. मात्र निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींवर आधारित ‘चेकमेट : हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ हे पुस्तक सध्या चांगलेच गाजत आहे. सुधीर सूर्यवंशी लिखित या पुस्तकात त्यावेळी पडद्यामागे घडलेल्या अनेक गोष्टींविषयी गौप्यस्फोट केले आहेत. याबाबतचे वृत्त झी-२४ तास या वृत्तवाहिनीने दिले आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून आणखी एक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. यामध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या गुप्त भेटीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कसा प्लॅन आखला, याचा खुलासा करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्या दिवशी शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकांवर बसणार, असे स्पष्टपणे सांगितले. या पत्रकार परिषदेनंतर शरद पवार त्यांच्या पत्नीसह पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
ही बातमी पण वाचा : …तर मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल – संजय राऊत
मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेने जात असताना पनवेलजवळच्या McDonald’s आऊटलेटजवळ पवारांनी आपली गाडी थांबवली. त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते संजय राऊत पवारांची वाट बघत होते. संजय राऊत पवारांच्या गाडीत बसले. यानंतर पवारांची गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. राऊतांची गाडीही त्यांच्या पाठीमागे येत होती. शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात तळेगाव टोलनाक्यापर्यंत पोहचेपर्यंत सुमारे तासभर चर्चा झाली. यावेळी राऊत यांनी आपण एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून रोखू, असा प्रस्ताव पवारांसमोर मांडला. जेणेकरून बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. राऊतांच्या या प्रस्तावानंतर शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी बोलण्याचे कबूल केले. मात्र, तुम्हीही राज्यातील काँग्रेस नेत्यांशी बोलायला सुरुवात करा, अशी सूचना पवारांनी राऊत यांना केली.
यानंतर तळेगाव टोलनाक्याजवळ संजय राऊत पवारांच्या गाडीतून उतरले आणि पुन्हा आपल्या गाडीने मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत आल्यानंतर संजय राऊत तातडीने उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी पवारांशी झालेली बोलणी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली. यानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. निकालानंतरच्या या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचा आक्रमक पवित्रा पाहून भाजपही अवाक झाली होती.
या दरम्यान मुंबई आणि पुण्यातील एका पत्रकारालाही संजय राऊत आणि शरद पवारांच्या या भेटीची माहिती मिळाली नव्हती. दोन्ही ठिकाणी पत्रकार नेत्यांच्या घरासमोर ठाण मांडून बसले होते. मात्र, शरद पवार आणि राऊतांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरच कोणालाही पत्ता लागू न देता बोलणी आटोपली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला