पावसाळ्यात जपा आपले सौंदर्य…

Beauty

उन्हाळ्याच्या दाहानंतर धरतीला पाण्याची जितकी आस लागलेली असते तितकीच आपल्या त्वचेला असते. उन्हाळ्यात सूर्यकिरणांचे त्वचेवर दुष्परिणाम झालेले असतात. पावसाळ्यातील ढग या किरणांपासून आपले संरक्षण करतात. हवेतील आर्द्रताही वाढलेली असते. त्यामुळे शुष्कपणा जाणवत नाही. तरीही त्वचेची काळजी ही घेतलीच पाहिजे. रोज रात्री झोपण्याअगोदर क्लीनिंग क्रीम किंवा लोशनने चेहरा व्यवस्थित पुसून पाण्याने धुवावा. हलके मसाज क्रीम लावावे. लेप लावतानाही पिठाचे लेप लावू नये कारण ते वाळायला वेळ लागते. शक्यतो फळांचे वा भाज्यांचे रस लावावेत. परंतु लेप, मसाज आणि टोनिंग हे सर्व वयाच्या महिलांसाठी आवश्यक आहे. उन्हाळा नाही म्हणून बाहेर जाताना कोणतेच संरक्षक प्रसाधन न लावता जाणे योग्य नाही. स्किन फ्रेशनर, स्किन टॉनिक, अ‍ॅस्ट्रिंजंट ही प्रसाधने वापरणे आवश्यक आहे.

सौंदर्यपावसाळ्यातल्या कुंद हवेत चेहऱ्यावर असणारे सुंदर रंग प्रकर्षाने जाणवतात. या ऋतूत घाम येत नाही त्यामुळे द्रवरूप फाउंडेशन लावायला हरकत नाही. पावसाळ्यात तेलकट त्वचेवर पॅनकेक मेकअप लावावा, कोरड्या त्वचेवर तो फार कोरडा वाटेल. रात्रीच्या समारंभाला जाताना डोळ्यांच्या शॅडोत चमकदार किंवा फ्रॉस्टेड रंग असतील तर बाहेरच्या हवेतला मंदपणा त्याने कमी होतो. या हवामानात केसांची फार काळजी घ्यावी लागते. पाण्यातील क्लोरीनचा डोक्याच्या त्वचेेला त्रास होतो. त्याने केस गळू लागतात. विहिरीचे किंवा बोअरिंगचे पाणी वापरत असल्यास त्यात क्षारनिर्मूलन करणारी रसायने घालून मग हलके झालेले पाणी केस धुण्यासाठी वापरावे. अन्यथा क्षार केसांवर बसून केसांचा मुलायमपणा नाहीसा होतो. या सुमारास केस गळू लागले वा राठ झाले तर केस धुवायला योग्य पाणी वापरून सौम्य शांपूने केस धुवावे व कोणत्याही आम्ल कंडिशनरचा वापर करावा. पांढरे विनेगार, थंड पाण्यात अर्धे लिंबू पिळून केलेले पाणी, ताकाच्या वा दह्याच्या वरचे पाणी या पदार्थांत आम्लता असते. केसांच्या वर साठलेले क्षार यामुळे काढून टाकले जातात व केस मऊ राहून चमकदार होतात.

ही बातमी पण वाचा : पावसाळ्यात अशी घ्या ‘पायांची’ काळजी….

पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणा-या माका, ब्राह्मी, नागरमोथा यांसारख्या वनस्पती उकळवून तयार केलेले तेल अतिशय उत्तम असते. या तेलाची कृती माका, ब्राह्मी यांचा पाला सम प्रमाणात घेऊन त्याची चटणी करावी. या चटणीच्या चारपट पाणी घालून ते जाड बुडाच्या पातेल्यात घालून जेवढ्या वजनाचा पाला तेवढ्याच वजनाचे तेल घालावे. तेल कोणतेही वापरले तरी चालेल. हे मिश्रण गॅसवर ठेवून पाणी संपूर्ण आटून तेल राहीपर्यंत उकळावे. थंड झाल्यावर गाळून ते केसांना मसाज करण्यासाठी वापरावे. या तेलाने केस वाढतात, गळणे बंद होते, पांढरे होण्याची प्रक्रिया कमी होते. पावसाळ्यात आपल्या केसांची आणि त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणून थोडा वेळ काढून योग्य ती काळजी घ्यावे आणि आपले सौंदर्य जपावे.