सिनेमाच्या नामांतराची लढवली खिंड

नावात काय आहे हे शेक्सपियरच्या लेखणीतून उतरलेलं वाक्य आपण अनेकदा ऐकतो. नाव हे असं एखाद्या व्यक्तीची ओळख असते तसंच एखाद्या सिनेमाचीही ओळख असू शकते. म्हणूनच सिनेमाचे नाव ठरवण्यासाठी खूप मेहनत घेतली जाते. काही वेळा निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या किंवा पटकथा लेखकाच्या मनातलं नाव उपलब्ध असतच असं नाही, तेव्हा सिनेमाच्या नावासाठी काही पर्यायी ठेवावे लागतात. पण तरीही माझ्या सिनेमाला तेच नाव हवं होतं अशी इच्छा सिनेमा बनवणाऱ्याच्या मनात राहून गेलेली असते. पण अचानक जेव्हा ती इच्छा पूर्ण होते तेव्हा सिनेमा बनवल्याच्या आनंदापेक्षा जे आपल्याला हवं होतं ते नाव आपल्याला सिनेमासाठी मिळालं याचा आनंदही खूप मोठा असतो. अशाच आनंदोत्सवात सध्या पावनखिंड या सिनेमाची टीम अगदी मनमुराद न्हाऊन गेलेली आहे.

खरंतर या सिनेमाचं नाव पावनखिंड (Pavankhind) हेच ठरवून टीम कामाला लागली होती. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आजपर्यंतच्या लोकप्रिय ठरलेल्या इतिहास विषयक सिनेमाच्या मालिकेतील हा सिनेमा 10 जूनला प्रदर्शित होतोय. लॉकडाउनपूर्वी या सिनेमाच्या निर्मितीला सुरुवात झाली आणि लॉकडाउननंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने सिनेमा रिलीज करण्यासाठी सगळे जण सज्ज झाले. हा सिनेमा बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यावर आधारित असल्यामुळे पावनखिंड यापेक्षा सिनेमाला दुसरं नाव शोभलं नसतं. पण हा सिनेमा निर्मिती प्रक्रियेत असताना काही कारणाने या सिनेमाला पावनखिंड हे नाव उपलब्ध झालं नाही. त्यामुळे जंगजोहर हे नवं नाव घेऊन सिनेमा रिलीज करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र या सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रयत्न कमी पडू दिले नाहीत आणि अखेर पावनखिंड हे नाव सिनेमाला उपलब्ध होऊ शकतं हे समजल्याबरोबर लगेच या सिनेमाचं जंगजोहर हे बदलून पावनखिंड करण्यात आलं. आता हा सिनेमा पावनखिंड याच नावाने जूनमध्ये पडद्यावर येणार आहे.

या निमित्ताने सध्या ही टीम खूप खुशीत आहे. दिग्पाल लांजेकर यांनी यापूर्वी फत्तेशिकस्त आणि फर्जंद हे इतिहासातील वेगवेगळ्या घटनांवर आधारित असलेले सिनेमे बनवले आहेत. प्रचंड अभ्यास करून मगच इतिहासपट हातात घेण्याची खास खासियत असलेले लांजेकर यांच्या या सिनेमाकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या सिनेमाचे लेखन चिन्मय मांडलेकर याने केलं आहे आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत गायक अभिनेता अजय पुरकर दिसणार आहे. तर फर्जंद या सिनेमाचा हिरो अंकित मोहन हा देखील पावनखिंड सिनेमामध्ये त्याच्या चाहत्यांना पहायला मिळणार आहे. एकूणच बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराजांसाठी कशाप्रकारे जीवाची बाजी लावली आणि शिवरायांच्या स्वराज्य मोहिमेत प्राणांची आहुती दिली त्याची ही कथा आहे.

या निमित्ताने बोलताना अभिनेता लेखक चिन्मय सांगतो, की खरे तर या सिनेमाचं नाव पावनखिंड असेच असायला पाहिजे होतं ही सल आमच्या मनात होती. कारण हा संपूर्ण सिनेमा हा पावनखिंड या लढाऊ मोहीमेच्या सभोवताली फिरणारा सिनेमा आहे. जेव्हा आपण एखाद्या सिनेमाशी जोडले गेलेलो असतो, मग ते कलाकार म्हणून असो, लेखक म्हणून असो, निर्माता-दिग्दर्शक असो किंवा काही आपले छोटेसे योगदान जरी एखाद्या सिनेमाशी असेल तरी आपल्याला सिनेमा आपल्या मुलासारखा वाटतो. आमच्या सर्वांच्या बाबतीत पावनखिंड या सिनेमाच्या निमित्ताने अशाच भावना होत्या. जेव्हा ही कथा म्हणून डोक्यात आली तेव्हापासूनच या सिनेमाला पावनखिंड हेच नाव असलं पाहिजे हे आमच्या सगळ्यांच्याच मनात होतं. या निमित्ताने माझी आणि दिग्पालची चर्चादेखील झाली होती. पण जेव्हा सिनेमाचं नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया असते त्यावेळी असे लक्षात आले की हे नाव उपलब्ध नाही. त्यामुळे जंग जोहर या नावाची नोंदणी करून सिनेमाची निर्मिती प्रक्रिया आम्ही सुरू ठेवली. अर्थात ही कोरोनाची परिस्थिती सुरू होण्यापूर्वीच्या गोष्टी आहेत. सिनेमा जून मध्ये रिलीज करण्याचं ठरवलं आणि त्या दृष्टीने तयारी सुरू झाली तेव्हा या सिनेमाच्या निर्मिती टीमने प्रचंड प्रयत्न करून सिनेमाच्या पावनखिंड या नावासाठी खूप पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हेच नाव उपलब्ध झालं आणि तेव्हा ठरवले की अजून सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी आपल्या हातात वेळ असल्यामुळे आपण पावनखिंड या नावाने हा सिनेमा प्रदर्शित करायचा आणि खऱ्या अर्थाने या सिनेमाच्या कथेला पावनखिंड हे नाव मिळाल्यामुळे न्याय मिळाला आहे असं आम्हाला वाटतं.

एखाद्या सिनेमाच्या नामांतराची सुद्धा अशी काही कथा असू शकते हे यानिमित्ताने अधोरेखित झालं. या सिनेमाची संपूर्ण टीम जून मध्ये हा सिनेमा रिलीज करण्यासाठी तयारीत आहे. पण त्याचबरोबर या सिनेमाला जे नाव हवं होतं ते नाव मिळाल्याचा वेगळाच आनंद या प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आहे. इतकेच नव्हे तर या सिनेमाच्या संपूर्ण टीमने एकत्र येत जंगजोहर या नावाला बाय-बाय करत पावनखिंड या नावाचं स्वागत केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER