पटोले, पुणे आणि आगामी पालिका निवडणुका…

Shailendra Paranjapeनाना पटोले यांची कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झालीय. लोकशाही मानणाऱ्या आणि शंभर वर्षांहून अधिक काळ कार्यरत या पक्षामधे निवड वगैरे नसते तर नेमणूक असते. निवडून आलेले आमदारदेखील एका ओळीचा ठराव करून नेतानिवडीचे अधिकारही केंद्रीय नेतृत्वाला देतात कारण नेतृत्वाच्या ब्रँण्ड व्हँल्यूवरच सर्वांचं बरं किंवा वाईट, चाललेलं असतं.

मुळात विदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेस मुसंडी मारेल की काय, ही भीती असल्याने विदर्भाचा प्रदेशाध्यक्ष असावा, ही मागणी राज्यातल्या कॉँग्रेसजनांकडून केली जात होती. मागणी म्हणजे तशी भावना विविध पातळ्यांवरचे कार्यकर्ते, नेते आपापल्या मर्जीतल्या केंद्रात वजन, स्थान असलेल्यांकडे व्यक्त करत होते. त्यामुळे आता पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्याने विदर्भात नक्कीच फरक पडू शकेल. पण पटोले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि स्वभावाचा विचार केला तर हा फरक कॉँग्रेस पक्षसंघटनेला केवळ विदर्भापुरता नव्हे तर राज्यभरही जाणवेल.

पटोले एक तर आक्रमक नेते आहेत आणि अपक्ष म्हणून निवडून येऊन नंतर ते भाजपावासीही होऊन आलेत. त्यामुळे कायम आणि कायम कॉँग्रेसनिष्ठ म्हणून असलेल्यांच्या भूमिकेला भाजपाविरोध ही एकमेव टोकदार भूमिका येऊ शकते. त्याऐवजी नाना पटोले आक्रमकतेबरोबरच भाजपाला काही घरचे आहेरही देऊ शकतील आणि ती त्यांची क्षमताही आहे.

राज्यामधे कॉँग्रेस पक्ष सत्तेमधे सरकारमधे असूनही एकूण निर्णय प्रक्रियेत त्या पक्षाला काही स्थान आहे की नाही, असा प्रश्न पडण्यासारखीच स्थिती आहे. बहुतांश निर्णय राष्ट्रवादी कॉँग्रेस अर्थात त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हेच घेत असल्याचे जाणवत आहे. आता पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही विधानसभाध्यक्षपद आता खुले झाले आहे आणि शिवसेना-कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून त्याबद्दल निर्णय घेतील, असं विधान शरद पवार यांनी केलंय. ते लक्षणीय आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला हा कॉँग्रेसमधल्या अंतर्गत दबावामुळे, असंही शरद पवार म्हणालेत.

पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेल्या नेमणुकीबरोबरच पुण्यातल्या रमेश बागवे आणि मोहन जोशी यांना राज्य कार्यकारिणीवर स्थान मिळालेय. वास्तविक, राज्यात कॉँग्रेस सत्तेत तरी आहे पण पुण्यात २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारून पालिकेची सत्ता हस्तगत केली. त्यामुळे कॉँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागत आहे. पण कॉँग्रेसच्या अंतर्गत लाथाळ्यांनी पालिकेतल्या नेत्यांची तोंड चार दिशांना असल्याने पालकमंत्री अजित पवार येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसी एकहाती सत्ता पुण्यात आणण्यासाठी प्रयत्न करतील, हे उघड आहे. त्यामुळे पटोले यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही खूप काम करावं लागणार आहे. राज्यातल्या दहा प्रमुख महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मधे आहेत. येणारा पावशाला संपल्यानंतर लगेचच त्या निवडणुकांचे डिंडिम वाजू लागतील.

त्यामुळे पटोले यांची नेमणूक ही केवळ राज्य पातळीवर किंवा प्रदेश कॉँग्रेसचा अंतर्गत मामला नसून राज्यात कॉँग्रेस पक्षाला राष्ट्रवादीचा धाकटा भाऊ म्हणून काम करावे लागत आहे, याची जाण केंद्रीय नेतृत्वाला असल्याचेच निदर्शक आहे. त्यामुळे एकीकडे पक्षसंघटना मजबूत करण्याबरोबरच आणि विदर्भाबाहेर विशेषतः पुणे, पिंपरी-चिंचवडसह सातारा, कोल्हापूर, मराठवाडा, खानदेश आणि कोकणातही पटोले यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

महापालिका निवडणुकांमधे मुंबई पालिकेचाही समावेश आहे पण त्यासाठी मुंबई प्रदेश कॉँग्रेस समिती स्वतंत्रपणे काम करत असल्याने आणि तिच्या अध्यक्षपदी अलीकडेच मुरब्बी कामगारनेते भाई जगताप यांची नेमणूक झाल्याने पटोले यांना मुख्यत्वे मुंबईवगळता इतर नऊ महापालिकांवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. विधानसभेमधे तीनही पक्षांचं पुरेसं बहुमत आहे आणि राज्य सरकार सध्या तरी स्थिर आहे. पण पटोले यांना मुख्य कामगिरी असणार आहे ती पक्ष म्हणून कॉँग्रेसचं अस्तित्व आगामी महापालिका निवडणुकीनंतर दाखवून देण्याची. ते तशी करतात, यावरच कॉँग्रेसचं नजीकच्या भविष्यातलं राजकारण आणि पटोले यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

शैलेन्द्र परांजपे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER