
मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र ‘सामना’ची भाषा विरोधकांसाठी वा कोणत्याही नकारात्मक बाबींसाठी ही जरा रांगडीच असते असेच अनेकांनी आतापर्यंत पाहिले आहे. त्यातच शिवसेना भाजपसोबत (BJP) सत्तेत असतानाही ते दिल्लीतील नेत्यांबाबत महाराष्ट्रातील नेत्यांना झोंबेल अशाच भाषेत अग्रलेख लिहीत असे. आता तर शिवसेनेने भाजपसोबत काडीमोडच घेतलाय त्यामुळे भाषेची तीव्रता आणखीनच वाढली आहे.
सामनातून नुकतेच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर तिखट शब्दांत टीका करण्यात आली. या टीकेची समाचार म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. पाटील यांनी शुक्रवारीच माध्यमांशी बोलताना अशाप्रकारची तक्रार आपण करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज त्यांनी हे पत्र रश्मी यांना पाठवले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी रश्मी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मोजक्या आणि नेमक्या शब्दांत तक्रार आणि विनंतीही केली आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय नेते तसेच भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल खालच्या स्तराची भाषा वापरण्यात येत आहे. या पत्रातून मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात, वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या, त्यातील भाषा या सर्वासाठी आपण संपादक म्हणून जबाबदार आहात. मी आपणास एक व्यक्ती म्हणून चांगला ओळखतो आणि मला खात्री आहे की, आपणालाही ही भाषा आवडत नसेल. आपणाला या पत्राद्वारे मी एवढीच विनंती करू इच्छितो की, संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा. जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा’, असे चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात नमूद केले आहे. ‘रश्मी वहिनी’ असा उल्लेख करत पाटील यांनी हे पत्र लिहिलं असून त्यांची तक्रार ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याबद्दल असली तरी त्यांचा उल्लेख मात्र पाटील यांनी पत्रात केलेला नाही.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना अशी तक्रार आपण करणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून संजय राऊत यांनी पाटलांना टोलाही लगावला होता. चंद्रकांतदादा जर रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असतील तर विलंब न लावता ताबडतोब त्यांनी ते लिहावे, असे राऊत म्हणाले होते. बापरे ते पत्र लिहित आहेत. मला त्यांची भीती वाटत आहे, अशी खिल्लीही राऊत यांनी उडवली होती. चंद्रकांत पाटील कालपर्यंत सामना वाचत नव्हते. ते आता सामना वाचू लागलेत ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी रोज आमचा पेपर वाचला पाहिजे. त्याने त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील, अशी टोलेबाजीही राऊत यांनी केली होती. आता पाटील यांनी रश्मी यांना पत्र लिहिल्यानंतर राऊत कोणती प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
@SaamanaOnline मध्ये भाजपाबद्दल वापरण्यात येणारी भाषा याबद्दल आज सामनाच्या संपादक सौ. रश्मी ठाकरे यांना पत्रलिहिले आहे. रश्मी ठाकरे यांना व्यक्ती म्हणून मी चांगला ओळखतो व मला खात्री आहे की, त्यांनाही ही भाषा आवडत नसेल. संपादक या नात्याने त्या या गोष्टींचा नक्की विचार करतील. pic.twitter.com/QQFeGiptQy
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 2, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला