पाटील यांनी खडसेंना सांगितलं थोबाडात मारा, आता बघू खडसे काय करतात – भुजबळ

Eknath Khadse-Chagan Bhujbal

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे नाराज मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकनाथ खडसेंना भावनीक साद घालत एकनाथ खडसे हे आमचे पालक आहेत. बंद खोलीत त्यांनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे (चॅनेल) समोर जाऊ नये, असे पाटील म्हणाले होते.

त्यावर महाविकास आघाडीचे मंत्री, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी एक विधान केले आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना सांगितलं थोबाडात मारा, आता बघू खडसे काय करतात. अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे तसेच, खडसे राष्ट्रवादीत आले तर स्वागतच आहे असेही भुजबळ म्हणाले.

का म्हणाले होते चंद्रकांत पाटील –

भाजप कार्यसमितीच्या बैठकीतनंतर चंद्रकांत पाटील त्यांनी पत्रकारांना सांगितले होते की, ‘खडसे राष्ट्रवादीत जाणार आहेत अशा बातम्या प्रसारमाध्यामांकडून दाखवल्या जात आहेत. पण ते पक्षाचे नुकसान होईल असं काहीही करणार नाहीत. आजच्या बैठकीला ते पूर्णवेळ उपस्थित होते. राष्ट्रगीत आटोपूनच गेले. तुम्ही पत्रकार त्यांना इकडेतिकडे ढकलता, ते पाय रोवून खंबीरपणे भाजपमध्येच आहेत. खडसे आमचे समजूतदार नेते आहेत. आमचे पालक आहेत.

आम्ही त्यांची मुलं आहोत. त्यांना इतकंच सांगणं आहे की चुकत असेल तर आमच्या थोबाडीत मारा पण सारखं त्या दांडक्यांसमोर जाऊ नका,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

एकनाथ खडसेंचा रष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा –

तर दुसरीकडे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार व त्यांना मंत्रीपदाची भेट मिळणार या चर्चेनेही जोर धरला आहे. खडसे मुंबईत आल्यानंतर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती खडसे समर्थकांनी दिली होती. मात्र, एकनाथ खडसे यांनी नियमित आरोग्य तपासणीसाठी मुंबईत आल्याचे सांगत शरद पवार यांची भेट घेण्याचे वृत्त नाकारले. दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांनीही अशी कोणतीही भेट ठरलेली नसल्याचे सांगितले होते.