राज्यात म्युकरमायकोसिसचे दीड हजारापेक्षा जास्त रुग्ण; राजेश टोपेंचे स्पष्टीकरण

Rajesh Tope

मुंबई :- राज्यात कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) संख्येत किंचितसा दिलासा मिळत असला तरी म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने महाराष्ट्रात एंट्री केली आहे. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे दीड हजारापेक्षा जास्त रुग्ण असल्याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले. इतकेच नाही तर या आजाराबाबत केंद्र सरकारकडे महत्त्वाच्या तीन मागण्या केल्याचंही टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत सहा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. त्यानंतर टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

टोपे म्हणाले, राज्यात सध्या दीड हजारापेक्षा जास्त म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे, ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती विविध कारणांमुळे कमी झाली आहे; तसंच ज्या रुग्णांच्या रक्तात आयर्न म्हणजेच फेरेटिनचं प्रमाण जास्त आहे, अशा रुग्णांना म्युकरमायकोसिसचा जास्त धोका असल्याचं टोपे म्हणाले.

अशा वेळी महाराष्ट्रातील म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा कोटा वाढवून द्यावा. तसंच या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात यावेत. एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची किंमत सहा हजारांच्या आसपास आहे. एका रुग्णाला २०-२० इंजेक्शन्स द्यावी लागत आहेत. अशा वेळी इंजेक्शन्सची किंमत कमी करावी अशी आग्रही मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराबाबत जनजागृतीची गरज असल्याचं टोपे म्हणाले. काळ्या बुरशीवर प्रतिबंधात्मक उपाय करायला हवे. त्यासाठी जनजागृती होणं गरजेचं असल्याचं टोपे यांनी यावेळी म्हटलंय.

दरम्यान, राज्यात कोरोनाची परिस्थिती सध्या आटोक्यात आहे. सध्या संख्येचा आलेख कमी होत आहे. सध्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण कमी होताना दिसत आहेत. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात (Maharashtra) रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, मराठवाड्यातील बीड येथे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला सातत्याने काळजी घ्यावी लागणार आहे. जागरूक राहावे लागणार आहे. चाचण्या कमी होत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, आज झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री, महाराष्ट्राची परिस्थिती सुधारत आहे, ही चांगली बाब आहे. महाराष्ट्र चाचण्यामंध्ये चांगले काम करत आहे, असे म्हणाले आहेत. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात आतापर्यंत तीन कोटी चाचण्या झाल्या आहेत.

आजच्या आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मी लसीच्या उपलब्धतेवर जोर दिला. लसीकरणाबाबत योग्य व्यवस्थापन होत नाही. कारण आज आम्हाला २० ते २२ लाख लोकांना लसीचा दुसरा डोस हवा आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जेवढ्या लसी लागत आहेत, त्या देण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी. ती आमची अपेक्षा आहे. जवळ-जवळ सगळ्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की, लसी विदेशातून मागवण्यासाठी एक जागतिक धोरण असायला हवं. यामध्ये मीसुद्धा होतो. असे नसेल तर सगळ्या राज्यांमध्येच स्पर्धा सुरू होईल. त्याचा फायदा देशाबाहेरच्या कंपन्यांना होईल. ही अनहेल्दी पॉलिसी नको, अशी मागणी सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्यांनी केल्याची माहिती टोपेंनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button