रुग्णांना बेड्सच्या उपलब्धतेसह वैद्यकीय उपचार द्यावे; चंद्रकांत पाटलांची आयुक्तांकडे मागणी

Chandrakant Patil

पुणे : कोरोनाच्या (Corona Virus) रुग्णांची संख्या जवळपास तीन हजारांवर पोहचली आहे. शहरात यावेळी रुग्णांना बेड्सच्या उपलब्धतेसह वैद्यकीय उपचार मिळवण्यात अनेक अडचणी येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत, अशा स्थितीत जम्बो रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावे, तसेच व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी. महापालिकेच्या हेल्पलाईन सेवेबाबत तक्रारी वाढल्या आहेत. ऑपरेटर्स फोन उचलत नाहीत, त्यांच्याकडे माहीती उपलब्ध नाही, यांसारख्या तक्रारींचा ओघ वाढत आहे. या सेवेचा नागरिकांना लाभ व्हावा, या दृष्टीने त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

खासगी रुग्णालयातील किमान ८० टक्के खाटा ह्या कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवाव्यात व त्या ताब्यात घेण्याची कार्यवाही त्वरित सुरू करावी, अशीही मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

वेगवेगळ्या वैयक्तिक कारणांमुळे किंवा जागेच्या कमतरतेमुळे बरेच रुग्ण घरी राहू शकत नाहीत, अश्या रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र तातडीने सुरू करावे. यासह जे रुग्ण घरीच विलगीकरणात राहू शकतात, अशांच्या व त्यांच्या नातेवाईकांचे प्रबोधन करून त्यांना रुग्णालयात भरती होण्यापासुन परावृत्त केल्यास अत्यवस्थ व इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी अधिक खाटा उपलब्ध होतील. या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER