क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांचा धिंगाणा; मुलींच्या कपड्यावर लिहिला अश्लील मजकूर

Solapur Quarantine Center

सोलापूर : मुलींच्या वसतिगृहातील आयसोलेशन सेंटरमध्ये (Isolation Center) विलगीकरणात ठेवलेल्या कोरोनाच्या (Corona) संशयित रुग्णांनी सेंटरमध्ये बराच उच्छाद मांडला. वसतिगृहातील मुलींच्या कपड्यावर अश्लील लिखाण केले. तिथल्या वस्तू पळवल्या. कागदपत्रेही फाडली. याचा निषेध करून याबाबत चौकशी करून करवाई करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

हे वसतिगृह सामाजिक न्याय विभागाचे आहे. जागेअभावी याचा उपयोग कोव्हिड सेंटरसाठी करण्यात येत आहे. येथे ठेवलेल्या संशयित रुग्णांनी मुलींच्या कपड्यावर स्वतःचे फोन नंबर लिहून अश्लील मजकूर लिहिला. मुलींचे सामान चोरून नेले. महत्त्वाची कागदपत्रे फाडलीत.

तिथेच विलगीकरणात असलेल्या एका महिलेने याचे मोबाईलमध्ये चित्रण करून एका मुलीला पाठवले. या वसतिगृहात दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. पाण्याच्या बाटलीत लघुशंका करून कपाटात ठेवल्या आहेत. काही मुलींच्या लॅपटॉपमध्ये त्यांचा खासगी डाटा आहे. त्याचा दुरुपयोग करण्याची भीती मुलींनी व्यक्त केली आहे.

पाच दिवसांपूर्वी तिथे आलेल्या रुग्णांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी मुलींनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. हा प्रकार अत्यंत भीषण असून तिथे आतापर्यंत किती पुरुष रुग्ण होते याची माहिती घेऊन त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी केली आहे. मुलींची शैक्षणिक उपकरणे आणि कागदपत्रे ताब्यात घ्या, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे. लवकर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER