सिस्टर अभया खून खटल्यात पाद्री व साध्वीला झाली जन्मठेप केरळमधील खटल्याची २८ वर्षांनी सांगता

kerala high court

थिरुवनंतपूरम : रोमन कॅथलिक ख्रिश्चनांमधील सिरो मलबार चर्च या एका पंथातील प्रशिक्षार्थी साध्वी सिस्टर अभया हिचा २८ वर्षांपूर्वी खून केल्याबद्दल त्याच चर्चचे एक पाद्री (Father) फादर थॉमस एम. कुटूर व एक साध्वी (Nun)  सिस्टर सेफी यांना  जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. खून झाला तेव्हा केरळमधील ख्रिश्चन समाजात जेवढी संतापाची लाट उठली होती तेवढ्यात तीव्रतेने या निकालाचे स्वागत करण्यात आले.

हा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) गेल्या आॅक्टोबरमध्ये दिला होता. त्यानंतर येथील विशेष ‘सीबीआय’ न्यायालयाचे सत्र न्यायाधीश के. सनल कुमार यांनी रोजच्या रोज सुनावणी करून खटला पूर्ण करून गोल्या शनिवारी या दोन आरोपींना दोषी ठरविले होते. आज त्यांना शिक्षा ठोठावम्यात आली. फादर कुटूर यांना खून व खून करण्यासाठी घरफोडी करणे या दोन गुन्ह्यांसाठी प्रत्येकी जन्मठेपेची तर पुरावा नष्ट केल्याबद्दल सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली. सिस्टर सेफी यांना खून व पुरावा नष्ट करणे यासाठी फादर कुटूर यांच्याप्रमाणेच शिक्षा ठोठावण्यात आल्या. आरोपींनी तुरुंगवासाच्या सर्व शिक्षा एकदमच भोगायच्या आहेत. याखेरीज दोन्ही आरोपींना प्रत्येकी पाच लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला.

फादर कुटूर सिस्टर अभयाचे अध्यापक होते तर सिस्टर सेफी तिच्या हॉस्टेलच्या रेक्टर होत्या. त्यामुळे ज्यांनी अभयाचा सांभाळ करायचा व तिला संरक्षण द्यायचे त्यांनीच विश्वासघाताने तिचा खून केल्याने दोन्ही आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी अभियोग पक्षाने केली. याउलट फादर कुटूर यांनी कमी शिक्षेची याचना करताना सध्याचे ७१ वर्षांचे वय व कर्करोगासारखा दुर्धर आजार ही कारणे दिली. सिस्टर सेफीने वृद्ध आई-वडील एकाकी होतील, ही सबब सांगितली.
सिस्टर अभयाच्या खुनाला कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता त्यामुळे संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारलेला होता. अभियोग पक्षाने उभे केलेले नऊ साक्षीदार उलटले तरी समोर आलेला पुरावा आरोपींना नि:संयपणे दोषी धरण्यास पुरेसा आहे, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला. या खटल्यात फादर जोस पुत्रीकय्यिल हेही आरोपी होते. त्यांना न्यायालयाने गेल्या वर्षी आरोपमुक्त केले होते.

सिस्टर अभया ही कोट्टायम येथील पायस टेन्थ कॉन्व्हेंटमध्ये धार्मिक शिक्षण घेणारी १८ वर्षांची विद्यार्थिनी होती. २७ मार्च, १९९२ रोजी तिचा मृतदेह कॉन्व्हेंच्या विहिरीत मिळाला. दोन्ही आरोपी त्याच कॉन्व्हेंटमध्ये अध्यापक होते. त्यांच्यातील घनिष्ट शारीरिक प्रेमसंबंध सिस्टर अभयाने पाहिले म्हणून दोघांनी खून करून तिला विहिरीत फेकली अशी ही केस होती. सुरुवातीस ही केस दडपण्याचा खूप प्रयत्न झाला. पण सिस्टर अभयाचे कुटुंब व स्थानिक ख्रिश्चन संघटनांनी नेट लावला.

सुरुवातीस स्थानिक पोलीस व नंतर राज्य गुप्तचर विभागानेही सिस्टर अभयाने आत्महत्या केली असा निष्कर्ष काढून ‘केस’ बंद केली. नंतर तपास ‘सीबीआय’कडे देण्यात आला. त्यांनीही सुरुवातीस दोन तपासी अहवाल देऊन हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे म्हटले. तिसºया अहवालात ‘सीबीआय’ने खून असू शकतो पण कोणी केला हे समजत नाही, असे म्हटले. परंतु मुख्य न्यायदंडाधिकाºयांनी हे तिन्ही अहवाल फेटाळून अधिक तपास करण्याचे आदेश दिले होते. शेवटी ख्रिश्चन कार्यकर्त्यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा तपास ‘सीबीआय’च्या कोचिन युनिटकडे सोपविला व त्यांच्या तपासातून हा खटला उभा राहिला होता.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER