विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी ‘पास’ बंद

Shri Vitthal Rukmini Temple

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाकरिता काल २० जानेवारीपासून ऑनलाईन बुकिंग न करता केवळ ओळखपत्र दाखवत भाविकांना दर्शनाकरिता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. पास बंद झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात असून भाविकांची दर्शनाकरिता गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (Shri Vitthal-Rukmini temple) १७ मार्चपासून दर्शनाकरिता बंद ठेवण्यात आले होते.

मात्र, राज्य शासनाच्या आदेशानुसार दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दररोज किमान एक हजार भाविकांना ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटी घालून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुखदर्शनाकरिता सोडण्यात आले. यानंतर भाविकांची मागणी लक्षात घेऊन वेळोवेळी ऑनलाईन बुकिंगची संख्या वाढवून ११ जानेवारीपासून ऑनलाईन बुकिंग केलेल्या आठ हजार भाविकांना दररोज मुखदर्शनाकरिता सोडण्यात येत होते. मात्र बुधवार, २० जानेवारीपासून ऑनलाईन बुकिंग न करता येणाऱ्या भाविकांना ओळखपत्र (आधारकार्ड) दाखवले तर थेट श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाकरिता सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दर्शनाकरिता भाविकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे.

मात्र, कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यात येणार आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाकरिता ६५ वर्षांपुढील व्यक्ती, १० वर्षांखालील मुले, गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्ती यांना दर्शनाकरिता प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच थर्मल स्क्रिनिंगमध्ये आजारी असलेल्या व्यक्तींनादेखील मंदिरात दर्शनाकरिता प्रवेश मिळणार नसल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER