परवशता पाश दैवे…!

mansi Phadke

हाय फ्रेंड्स ! आपल्याला लहानपणापासून शाळेत शिकवलं जायचं ,मानवाच्या गरजा कोणत्या तर अन्न वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजा आहेत. कालांतराने आपण मोठे झालो आणि या प्राथमिक शब्दाचा अर्थ कळायला लागला. कारण तोपर्यंत गरजा भरभक्कम वाढल्या होत्या. परंतु या गरजा होत्या, सगळ्या भौतिक गरजा ! मात्र त्याही पलीकडे आपल्या काही अपेक्षा होत्या. की आपले आयुष्य हे स्टेबल, सेफ असाव, आपलं कुणी कौतुक करावं, शरीर सांगायचं थकला किंवा थकली आहेस. थोडं थांब !पण हे ऐकायला वेळ नसायचा. परंतु या खरोखरच अपेक्षा होत्या का ?

नाही या अपेक्षा नाही ,गरजाच आहेत . जसं की आपण काल पाहिलं. कारण अपेक्षा पूर्ण व्हायलाच हव्यात असं नसतं. गरजा तरी पूर्ण व्हायलाच हव्या असतात. त्याविना आयुष्य कितीही लांब झाले तरी त्याला एक वितभर ही खोली नसेल .आजच्याही लेखात आणखीन दोन गरजा, ज्या खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं त्याबद्दल जरा निवांत बोलूया !

त्यापैकी एक म्हणजे Need for intimacy ! म्हणजे जवळीक साधता येणारी आणि आपला विनाशर्त स्वीकार करणारी व्यक्ती असणे. आणि दुसरी गरज Need of Autonomy. म्हणजे स्वायत्ततेची स्वतंत्रतेची गरज, स्वतःसाठी आणि इतरांसाठी देखील. याचा दुसरा भाग आणखीन नीड फोर कंट्रोल किंवा सेन्स ऑफ कंट्रोल हा पण आहे.

पहिली गरज म्हणजे आपल्या अगदी जवळची व्यक्ती .जिला आपल्या इच्छा आकांक्षा सुखदुःख मनीचे गुज, फक्त तिला आणि तिलाच आपण सांगू शकतो. अशी आपुलकीची व्यक्ती मग त्यात आई-वडील, बहिण-भाऊ ,आपली मुलगा-मुलगी ,आयुष्याचा जोडीदार ,मित्र-मैत्रिणी, मावशी ,आत्या कुणीही. परंतु आई-वडिलांना उगीच काळजी नको म्हणून आपण काही गोष्टी शेअर करू शकत नाही, तर मुलांना शेअर करता न येणाऱ्या काही गोष्टी असतात. खिल्ली न उडवणारे आणि माघारी गॉसिपिंग न करणारे मित्र मैत्रिणी असतील तर ती एक जागा असते.

पण याही ठिकाणी आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे विनाशर्त स्वीकार .आपण जसे आहोत तसेच त्याला आवडतो अशी ती व्यक्ती असायला हवी. असे लोक कमीच असणार. बरेचदा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत आपण जास्त रिलॅक्स राहू शकतो ,कारण नातेवाईक आपल्याला judge करत असतात सतत ! आपलं चालणं, बोलणं, हसणं ,वागणं. त्यामागे काहीएक अपेक्षा सुद्धा असतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ! आपल्याला सर्वत्र वावरत असताना विविध मुखवटे घालावे लागतात, लोकांच्या अपेक्षेप्रमाणे ते बदलावे लागतात. पण आयुष्यात काही जागा अशा असतात तिथे आपण मुखवटे उतरून ठेवतो, मग ती जागा मित्र मैत्रिणी असतील किंवा आयुष्याचा पार्टनर.जीवनसाथी म्हणून एकत्र येणाऱ्या व्यक्तींनी परस्परांचा विनाअट स्वीकार म्हणजे तू जसा / जशी आहे,तसा/तशी मला आवडते. असा करणे हे खूप आवश्यक असतं. तरचं ती खरी intimacy !

दुसरी गरज स्वायत्ततेची. म्हणजे स्वतंत्रता ! याचे महत्त्व प्रत्येकचं जण जाणत असतं.” परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला .”पारतंत्र्याचा तो अंधकारमय काळ आपल्या सगळ्या पूर्वजांनी अनुभवलाय .त्या वेळेची बंधने बघितले किंवा आपल्या येथील बाजारपेठेचा, माणसांचा ,समृद्धी चा वापर दुसऱ्या देशासाठी केला गेला, भाषणा वरची बंदी, मत व्यक्त करण्यावरची बंदी ,अकारण लादलेले विविध कर त्यामुळे जनता कशी भरडली गेली हे जेव्हा वाचनात येतात तेव्हा मन सुन्न होतं. पण आता स्वातंत्र्य मिळूनही बराच काळ लोटला. लोकशाही आली. तरीही सर्वच बाबतीत असमानता अजून आहेच. आर्थिक असमानता, वर्णभेद .

स्त्री पुरुष समानता या बाबतही बरेच संघर्ष झाले. स्त्रियांना शिक्षण मिळू लागलं त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. परंतु खूप गोष्टीत ,उदाहरणार्थ स्वतःचे निर्णय घेणे ,मुक्त वावरणे, हवे ते कपडे घेणे याप्रसंगी अजूनही हवी तशी मोकळीक नाही. याविषयीचा एक प्रसंग !

एका कार्यशाळेमध्ये एका मेंटोर ने सगळ्या सहभागी स्त्रिया ना सांगितलं की, तुम्ही असा एखादा प्रसंग शेअर करा की ज्यामुळे तुम्हाला आपण खूप काही पण हटके किंवा आगळेवेगळे पाऊल उचललं असं वाटतंय ! सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रसंगाचे वर्णन केले.

एका स्त्रीने सांगितले खूप दिवसांनी त्यांचा दहावीच्या मित्र-मैत्रिणींचा व्हाट्सअप ग्रुप बनला. सगळ्यांचे संपर्क होऊ लागले आणि त्यांनी महाबळेश्वरला एक गेट-टुगेदर ठेवले .हीचे जाऊ की नाही? कशी परवानगी घेऊ ?असं सुरू होतं. शेवटी जायचं नक्की केलं. पण तेवढ्यात तिच्या बॅच मधील गावात राहणाऱ्या एका मित्राचा फोन आला कि ” मी उद्या माझी कार घेऊन जाणारच आहे अनायसे. तर तुही चल माझ्याबरोबर .थोड्या गप्पाही होतील आणि वेळ पटकन जाईल. कळव मला तसं !”मात्र या गोष्टीच तिला खूप टेन्शन आलं. घरादाराला ,मुले ,नवरा सगळ्यांना सोडून एक तर मजा करायला जायचं होतं .दुसरी गोष्ट तो मित्र घ्यायला येणार होता. त्याच्याबरोबर जायचं तर सासू-सासरे ,नवरा काय म्हणतील ? तिचे चलबिचल वाढत होती. तिची ही अस्वस्थता तिच्या मुलीने ओळखली.

ती म्हणाली ,”आई किती वेडी आहेस तू? तो तुझा मित्र आहे. आणि तो इतक्या चांगुलपणाने तुला विचारतो आहे.त्याऐवजी धडपडत लाल डब्याने कशासाठी जाणार आहेस तू ? मित्राबरोबर जाण्याचं टेंशन काय यायचे आहे ? उलट खूप गप्पा होतील आणि तुला मजा येईल.”तेव्हा ती मित्राला कळवते. दुसऱ्या दिवशी मित्र गाडी घेऊन येतो, आत्मविश्वासाने ती त्याच्या शेजारी ,समोर बसते आणि वर बघते. मुले व नवरा गॅलरीतून छान हसत टाटा करत असतात .

यावर त्या बाई म्हणाल्या ,तुमचे सगळ्यांचे अनुभव छान आहे. पण एक गोष्ट ऐका तुम्ही ज्याला भन्नाट किंवा वेगळं काही तरी म्हणत आहात, ते अजिबात वेगळं काहीही नाही. तर तो तुमचा अधिकार आहे. जो तुम्ही घ्यायलाच पाहिजे. एखादीचा नवरा जेव्हा म्हणतो ,हो मी तुला नोकरी करू देतोय, तेव्हा करू देणारा न देणारा तो कोणी नसतो. तोही केवळ तिचाच निर्णय असायला हवा. अर्थात याला दुसरीही बाजू आहे, त्याला नोकरी केलेली आवडत नाही म्हणून न करणे हा तिचा वेडेपणा आहे कारण स्वतःच्या स्वातंत्र्यावर ती स्वतः बंधने घालते. या बाबतीत असणारे हे अधिकार तिचे तिलाच कळत नाही .कारण वर्षानुवर्षांची सवय आणि संस्कार. थोडक्यात खरं स्वातंत्र्य हवं असेल तर आपले अधिकार आपल्याला माहीत हवेत.

याचा अर्धा भाग म्हणजे” नीड फोर कंट्रोल “(सेन्स ऑफ कंट्रोल ) कधी तरी आमचं आमच्यावरच नियंत्रण किंवा कंट्रोल राहत नाही .असं वाटतं आम्ही सैरभैर होतो, काही सुचत नाही आणि खूप बेचैन होतो ,पण आम्ही काहीही करू शकत नाही. असं बरेचदा घडतं. परंतु आम्ही आजूबाजूच्या परिस्थितीशी पर्यावरणाची जेव्हा सलोखा राखतो ,समायोजन राहतो तेव्हा हा नियंत्रित वातावरणात उत्तम जीवन म्हणजे अस्तित्व राखू शकतो. सेन्स फोर कंट्रोल कडे घेऊन जाणाऱ्या अजूनही काही गोष्टी आहेत. त्या म्हणजे निश्चितता, पुढे काय होऊ शकेल याचे योग्य आकलन, काही गोष्टींची पूर्तता , तीही वेळच्यावेळी यामुळे नंतरची काळजी, धडपड टळते. गोष्टी कशा घडतात याविषयीचे ज्ञान असणं म्हणजे कंट्रोलचे संपूर्णत्व !
बरेचदा आपण दुसऱ्याच्या कंट्रोल खाली राहाणेही पसंत करतो. जसे की आपले पालक. कारण त्या ठिकाणी विश्वास असतो आणि कुठलीही रिस्क जाणवत नाही. तसेच बरेचदा रूढी परंपरा याही आपण अशाच जपतो .त्यांचे नियंत्रण पाळतो. बरेचदा ग्रुप मध्ये काम करतानाही आपण ग्रुपचे नियम पाळतो.

तसेच” लोकस ऑफ कंट्रोल “ही एक संकल्पना आहे या बाबत. यात दोन प्रकार असतात. इंटरनल आणि एक्स्टर्नल, अंतर्गत आणि बाह्य ! अंतर्गत लोकस मध्ये व्यक्तीने स्वतःचे स्वतःवर नियंत्रण मान्य केलेले असते, ती व्यक्ती स्वयंप्रेरित असते. तर काही व्यक्तींचा एक्स्टर्नल म्हणजे बाह्य, लॉकस ऑफ कंट्रोल असतो .अशी व्यक्ती दैववादी असून स्व प्रयत्नांवर तिचा विश्वास नसतो ,तर नशीबावर तिचा भरवसा असतो.

म्हणूनच स्वातंत्र्याच्या संकल्पनेत स्वतःवर स्वतःचे नियंत्रण, अंतर्गत रित्या जास्त महत्त्वाचे आहे.स्वतः स्वतंत्र असणे आणि दुसऱ्याला स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ देणे दोन्ही महत्वाचे. रणदुंदुभी या नाटकातील वीर वामनराव जोशी यांचे यांचे संगीत असलेले पद ,यावेळी खूप महत्त्वाचे वाटते ते त्यातील शब्द योजनेमुळे . पारतंत्र्याचे वर्णन करताना ते म्हणतात की, या परवशतेचा फास ज्याच्या नशिबाला आलेला आहे त्याचे दुःख काय म्हणावे ! सजीवअसूनही मरणाचे भोग त्याला भोगावे लागतात .घरचा मालक असूनही चोरीचा आळ येतो. सगळे सुख भोगत असताना त्याला मात्र कष्ट करावे लागतात ! किती दयनीय परिस्थिती .हे पद लिहिताना देश पारतंत्र्यात होता म्हणून ते पुढे म्हणतात की, स्वतःची मातृभूमी सुद्धा त्याला बंदिशाला किंवा तुरुंग होऊन बसते. असे हे पारतंत्र्याचे दुःख ! स्वतःचे सगळे असूनही काहीच नाही ! कुठलही पारतंत्र्य ते तितकच दुःख देणारं ! परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला !

फ्रेंड्स ! म्हणूनच कोणीतरी जिवाभावाच जोडू या.आपणही कुणाचातरी विनाअट स्वीकार करूया ! स्वतःवर स्वतः नियंत्रण मिळवून, तुम्ही, आम्ही ,आपण सगळे मिळून स्वातंत्र्य उपभोगू या !

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER