पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संजय राऊतांवर ठाम विश्वास; पुन्हा मुख्य प्रवक्तेपदी वर्णी

Sanjay Raut - CM Uddhav Thackeray

मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) व कंगना (Kangana Ranaut) प्रकरणात विरोधकांना सडेतोड उत्तर देणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा ठाम विश्वास दाखवला आहे. संजय राऊत यांची पुन्हा एकदा पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळं यापुढील काळातही राऊत हे विरोधकांवर बरसताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे बिहारच्या निवडणुकीत संजय राऊत स्टार प्रचारक असून, उमेदवारांच्या प्रचारात ते विरोधकांवर कशा प्रकारे शब्दांचे बाण सोडणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीने पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात संजय राऊत हे मुख्य प्रवक्ते आहेत. त्याशिवाय, अन्य १० प्रवक्त्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, महापौर किशोरी पेडणेकर यांचा अन्य प्रवक्त्यांमध्ये समावेश आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आणण्यासाठी संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. शिवसेनेचा ठसा उमटेल अशा शब्दांत राऊत हे पक्षाची भूमिका मांडत असतात. राज्यसभेवर खासदार असल्यानं दिल्लीतील घडामोडींवरही त्यांचं बरंच लक्ष असतं. अनेक पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत. राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांशीही त्यांचे मधुर संबंध आहेत. पक्षाची भूमिका मांडताना त्यांना त्याचा अनेकदा फायदा होतो. संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक आहेत. ‘सामना’तूनही पक्षाची भूमिका ते बिनधास्त मांडत असतात. त्यामुळं शिवसेना सतत देशपातळीवर चर्चेत असते. त्यांच्या ह्या जमेच्या बाजू लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांची पुन्हा एकदा मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER