‘टीआरपी’ घोटाळ्यात पार्थो दासगुप्तांना मिळाला जामीन

Parthodas Gupat - Mumbai hc

मुंबई : टीव्ही वाहिन्यांची दर्शकसंख्या पैसे घेऊन लबाडीने फुगविण्याच्या कथित घोटाळ्यात अटक होऊन गेले अडीच महिने कोठडीत असलेले ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रीसर्च कौन्सिल’चे (BARC) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पार्थो दासगुप्ता यांना अखेर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

दासगुप्ता यांनी जामीनासाठी केलेला अर्ज मंजूर करताना न्या. प्रकाश डी. नाईक यांनी असा आदेश दिला की, दासगुप्ता यांना तूर्तास दोन लाख रुपयांच्या रोख जामिनावर मुक्त करण्यात यावे. त्यानंतर सहा आठवड्यांत त्यांनी रीतसर जामिनाच्या औपचारिकता पूर्ण कराव्यात.

सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर दासगुप्ता यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्या. नाईक यांनी त्यावरील सुनावमी पूर्ण झाल्यावर १६ फेब्रुवारी रोजी निकाल राखून ठेवला होता.

दासगुप्ता जून २०१३ ते नोव्हेंबर २०१९ या काळात ‘बीएआरसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ‘रिपब्लिक टीव्ही’या वृत्तवाहिनीचे ‘टीआरपी रेटिंग’ फुगविण्यासाठी त्या वाहिनीचे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी यांच्याकडून  १२ हजार डॉलर व ४० लाख रुपये रोख घेतल्याचा दासगुप्ता यांच्यावर आरोप आहे. २४ डिसेंबर रोजी अटक झाल्यापासून ते तळोजा कारागृहात आहेत.

इतरही वृत्तवाहिन्यांनी अशाच प्रकारे ‘टीआरपी’ वाढवून घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकूण १५ आरोपींचा हात असल्याचा दावा केला आहे. त्यापैकी दासगुप्ता, ‘बीएआरसी’चे ‘सीओओ’ रोमिल रामगढिया व ‘रिपब्लिक टीव्ही’चे ‘सीईओ’ विकास खानचंदानी यांना अटक झाली. रामगढिया व खानचंदानी यांना याआधीच जामीन मिळाला आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER