… त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची चूक राष्ट्रवादी करणार नाही

Parth Pawar, crisis-on-bhagirath-bhalke-vs-parth-pawar

सोलापूर :- दिवंगत आमदार भारत नाना भालके (Bharat Bhalke) यांच्या मृत्यूनंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर पंढरपूर येथे  भारत  भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या नावाचा आग्रह स्थानिक पातळीवर होताना दिसत आहे. यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघामध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांनी बाहेरील उमेदवाराला विरोध दर्शवला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. मात्र ही चर्चा प्रसारमाध्यमे आणि वर्तमानपत्रातून होताना दिसत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून या उमेदवारीबाबत पूर्णत: खंडन करण्यात आले आहे. २००९ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनाही राष्ट्रवादीने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात उमेदवारी दिली होती. मात्र स्थानिक असलेल्या भारत नाना भालके यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता.

त्यामुळे स्थानिक उमेदवाराला प्रथम पसंती असेल. त्यामुळेच पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची चूक राष्ट्रवादी करणार नाही, किंबहुना ही फक्त अफवा असेल, असं पत्रकार महेश खिस्ते यांनी सांगितलं. “पंढरपूर मतदारसंघांतून पार्थ पवार यांची उमेदवारी ही केवळ अफवा आहे. मात्र पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भालके कुटुंबाला स्थान मिळणे अपेक्षित असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. भारत नाना भालके यांच्या अकाली निधनामुळे मतदारसंघांमध्ये सहानुभूतीची लाट आहे. पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून पवार कुटुंबीयांना बदनाम करण्याचे कटकारस्थान दिसत आहे. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघामधून त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती, याची आठवणही कार्यकर्ते करून देत आहेत.

त्यामुळे उमेदवारांना स्थानिकच असला पाहिजे, अशी त्यांची भावना आहे.” असं ज्येष्ठ पत्रकार अशोक गोडगे यांनी नमूद केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी २०१९ मधील मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. पार्थ यांच्या बाजूने पवार घराण्याची मोठी राजकीय ताकद आहे. २०१९ च्या पराभवानंतर पार्थ पवार हे राज्याच्या राजकारणामध्ये कुठेही सक्रिय होताना दिसले नाहीत. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभामधून राष्ट्रवादी काँग्रेस आमदारकी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र गावपातळीवर पार्थ पवार यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसत आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांकडून पार्थच पुनर्वसन, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची उमेदवारी देणार ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER