पार्थ ‘निर्णय’ घेण्याची शक्यता; ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात पवारांच्या घरातून?

Parth Pawar-Sharad Pawar

मुंबई :- शरद पवार (Sharad Pawar) यांनी नातू पार्थ (Parth Pawar) याला प्रसारमाध्यमांसमोर अपरिपक्व म्हटल्यानंतर राष्ट्रवादीतले राजकारण ढवळून निघाले आहे. या वादात राणे कुटुंबाने पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. हा भाजपाचे (BJP) ‘ऑपरेशन लोटस’ महाराष्ट्रात सक्रिय झाल्याचा संकेत मानला जातो आहे व भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ पवारांच्या घरातूनच सुरू केल्याची चर्चा आहे. या वादात शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) समोरासमोर येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणावर अजित पवार यांनी अजून काहीही प्रतिक्रिया दिली नाही. पार्थ पवार कोणताही निर्णय वडिलांना विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही. त्यामुळे पुढे हा वाद कोणते वळण घेतो याकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांनी पार्थला अपरिपक्व म्हटले. या टीकेनंतर पार्थ पक्ष सोडणार असल्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

या भेटीत पार्थबद्दल चर्चा झाल्याची शक्यता आहे. पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, असा अजित पवार यांचा आग्रह होता. त्याला शरद पवार यांनी विरोध केला. पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी देता येणार नाही, असे स्पष्ट सांगितले. त्यावरून वाद निर्माण झाला, अशी माहिती एका पत्रकाराने वृत्तवाहिनीवरच्या चर्चेत दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, ‘माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचे तर महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण कोणी अन्य चौकशीबाबत म्हणत असेल तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही.

काही बोलायचे नाही

‘शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही’, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती. पार्थ पवारांनी भूमिपूजनाच्या दिवशी ‘जय श्रीराम’ची घोषणा देत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

लोकसभा निवडणुकीत २०१९ ला पार्थ राष्ट्रवादीच्या तिकिटावर मावळ मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास दोन  लाख मतांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता.

ही बातमी पण वाचा : ‘आधी घर सांभाळा’, राष्ट्रवादीच्या ‘मिशन घरवापसी’वर भाजपाचा टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER