जेव्हा पारसी समुदायाने रोखले होते जवानी की हवाचे प्रदर्शन

Parsi community.jpg

आजकाल एखाद्या संवेदनशील विषयावर चित्रपट (Movies on sensitive topics) निर्माण करणे सोपे नाही. कोण कधी उभा राहिल आणि चित्रपटाला विरोध करेल हे सांगता येत नाही. शिख कॅरेक्टर असेल तर त्याने दाढीच अशी वाढवली किंवा डोक्यावर पगडीच अशी बांधली असे कारण देऊन चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात येतो. कधी एखाद्या ऐतिहासिक चित्रपटाला विविध कारणामुळे विरोध केल्याचे दिसून येते. तर कधी हिंदू-मुस्लिम विषयावरील चित्रपटाला धार्मिक रूप देऊन राजनीतिक पक्ष विरोध करताना दिसून येतात. गेल्या काही वर्षात अशी अनेक उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. पण या विरोध करणाऱ्यांमध्ये आपण कधीही पारसी समुदायाला पाहिलेले नाही. अनेक चित्रपटात पारसी माणसाचे विनोदी चित्रण केलेले असते पण पारसी समुदाय कधीही रागावत नाही. पण याच पारसी समुदायाने जवानी की हवा नावाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. ही घटना आताची नसून 1935 ची आहे त्याचीच ही रंजक कथा.

बॉम्बे टॉकिजने 1935 मध्ये ‘जवानी की हवा’ नावाचा चित्रपट तयार केला होता. देविका राणी अभिनीत या चित्रपटाचे दिग्दर्शन फ्रँज ऑस्टनने केले होते. या चित्रपटाद्वारे सरस्वती देवी नावाची महिला प्रथमच संगीतकार म्हणून बॉलिवुडमध्ये उदयास आली होती. देशातील ही पहिली महिला संगीतकार. या सरस्वतीदेवीला पारसी समुदायाने विरोध करीत एक पारसी महिला असा चित्रपट कसा करते असा प्रश्न उपस्थित केला होता. आता तुम्ही म्हणाल सरस्वतीदेवी पारसी कशी? तर सरस्वती देवीचे खरे नाव होते ख़ुर्शीद मिनोचर होमजी. त्या आपल्या बहिणींसोबत ‘होमजी सिस्टर्स’ नावाने लखनौमध्ये ऑर्केस्ट्रा पार्टी चालवत असत. प्रख्यात संगीताचार्य विष्णुनारायण भातखंडे यांच्याकडून त्यांनी संगीताची दीक्षा घेतली होती. 1927 मध्ये सुरु झालेल्या इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या रेडियो स्टेशनमध्ये त्या ऑर्गन वाजवून गाणे गात असत. 1934 मध्ये त्यांची भेट मुंबईत हिमांशु राय यांच्याशी झाली आणि त्यांनी जवानी की हवाच्या संगीताची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि नाव दिले सरस्वती देवी. मात्र पारसी समुदायाला त्यांचे खरे नाव माहिती असल्याने त्यांनी विरोध केला. मात्र कंपनीतील पारसी गुंतवणूकदारांनी त्यांची समजूत काढली आणि चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता.

पत्नीमुळे मुंबईत येऊ शकले महबूब खान

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव म्हणजे महबूब खान. त्यांनी औरत, अनमोल घडी, मदर इंडिया, रोटी, आन, अंदाज एकाहून एक सरस चित्रपट भारतीय प्रेक्षकांना दिले आहेत. मदर इंडिया तर ऑस्करसाठी नॉमिनेट झाला होता. ऑस्करपर्यंत झेप घेणारे पहिले निर्माता दिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख आहे. चित्रपटांनी झपाटलेल्या मेहबूब खान यांना केवळ पत्नीमुळेच मुंबईत येण्याची संधी मिळाली आणि म्हणूनच ते चित्रपटसृष्टीत नाव कमवू शकले.

गुजरातमधील बडौदा येथे जन्मलेले महबूब खान सोळाव्या वर्षीच चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी मुंबईला येऊ इच्छित होते. पण त्यांना परवानगी मिळत नसल्याने त्यांनी अनेक वेळा घरातून पळण्याचा प्रयत्न केला. एकदा यशस्वी होऊन मुंबईला आलेही. पण ओळखीच्या माणसाने त्यांना ओळखले आणि परत घरी पाठवून दिले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ते घरातून पळून मुंबईला येण्यास निघाले तेव्हा पुन्हा एकदा ओळखीच्या माणसाने त्यांना पकडून घरी नेले. घरी गेल्यानंतर ते पळून जाऊ नयेत म्हणून त्यांचे लग्न करण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्या पथ्थ्यावरच पडला. चित्रपटसृष्टीत काम करण्याची आवड त्यांनी पत्नीला सांगितली आणि मुंबईला जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांच्या पत्नीने घरच्यांना काहीतरी वेगळे कारण सांगून महबूब खान यांना मुंबईला जाण्याची परवानगी मिळवून दिली. महबूब खान मुंबईला आले आणि चित्रपटसृष्टीत एक्स्ट्रा म्हणून काम करू लागले. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शनात उडी घेतली आणि चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आपले नाव कोरले. पत्नीने मदत केली नसती तर महबूब खान मुंबईला येऊच शकले नसते आणि चित्रपटसृष्टी एका चांगल्या दिग्दर्शकाला मुकली असती. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात ते खरे आहे हेच या उदाहरणावरून दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER