दोन महिन्यांच्या शाळेसाठी वर्षभराच्या फीची सक्ती

पुणे : कोरोनामुळे (Corona Virus) बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. पण त्या आता दोनच महिने चालणार आहे. मात्र यासाठी संपूर्ण वर्षाची फी (Annual-admission-charges) भरण्याची सक्ती काही खासगी शाळांकडून केली जात आहे. त्यामुळे पालकांत संतापाची लाट उसळली आहे.

कोरोनामुळे आर्थिक तंगी असताना तसेच इतर कोणत्याही अॅक्टीव्हिटी घेतल्या नसताना दोन महिने शाळेसाठी हा भुर्दंड कशासाठी लादला जात आहे, असा सवाल पालक करीत आहेत. यावर नियंत्रण असणारा शिक्षण विभाग मात्र गप्प आहे.
कोरोना काळात सर्व व्यवहार ठप्प होते. उद्योग, व्यापार बंद होते. शाळांही लॉकडाऊन केल्या होत्या. या कालावधीत अनेकांचे मोठे नुकसान झाले. काहींच्या नोकऱ्या गेल्या. पगार कपात झाले. उद्योग, व्यवसायांवर संक्रांत आल्याने अनेकांचे अर्थाजन थांबले. आता सर्व काही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शाळा सुरू होऊ लागल्या आहेत.

परंतु शाळांमधून फी भरण्याचा ससेमिरा पालकांच्या मागे लावला जात आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या पालकांना हा धक्का सहन न होणारा आहे. वर्षभरात खेळ, गॅदरिंग, सहल, पुस्तके, शालेय साहित्य, विविध स्पर्धा व इतर कोणत्याही एक्स्ट्रॉ अॅक्टिव्हिटी शाळांनी घेतलेल्या नाहीत. केवळ ऑनलाईन क्लास घेतले. यातून विद्यार्थी किती शिकले, हा संशोधनाचा विषय आहे. शिकण्यापेक्षा मुलांना मोबाईलचाच जादा नाद लागला आहे. तसेच रिचार्जसाठी मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च करावी लागली, अशा पालकांच्या तक्रारी आहेत.

कोरोना कालावधीत शाळांना शिक्षकांच्या पगाराव्यतिरिक्त मेटेनन्स व अन्य कोणताच खर्च आलेला नाही. काही शाळांनी शिक्षकांनाही कमी वेतन दिले आहे. आता शाळा दोन महिनेच चालणार आहेत. यात शिकविण्याशिवाय काहीही होणार नाही. उलट मुलांवर अभ्यासाचा ताण येणार आहे. याची पालकांना चिंता आहे. असे असताना काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा मात्र पूर्ण वर्षाची फी मागत आहेत. मुलांकडून पालकांना तसे निरोप दिले जात आहेत. पालकांना शाळेतून फोनही केले जात आहेत. त्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. यावर नियंत्रण असणारा शिक्षण विभाग मात्र काहीही अॅक्शन घ्यायला तयार नाही. केवळ वरून आलेला आदेश खाली पाठविण्याचे काम केले जात आहे.

काही संघटनांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे शिक्षण विभागाने थोडीफार हालचाल सुरू केली आहे. परंतु अशा शाळांवर कारवाईचा मोठा बडगा उभारावा, अशी मागणी पालकांची आहे.

काही शाळा सक्तीने फी वसूल करीत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. पालक संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. शासनाने कोणत्याही शाळेने पालकांकडून सक्तीने फी घेऊ नये, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही कडक कारवाई करीत आहोत. पालकांनी न घाबरता शिक्षण विभागाकडे तक्रारी द्याव्यात,असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.