
पुणे : परळीतील एका तरुणीनं चार दिवसांपुर्वी म्हणजेच 7 फेब्रुवारीला पुण्यात आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर ह्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या आत्महत्याच्या चौकशीसाठी भाजप (BJP) आक्रम झाला असून बाजपने रितसर तक्रारदेखील दाखल केली आहे.
पुजा चव्हाण (Puja Chavan)असं त्या तरुणीचं नाव असून ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात रहात होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली.
मुळची परळीची 22 वर्षीय पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला.
महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण, पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.
पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी भाजपच्या महिला नेत्या आणि आघाडी आता आक्रमक झाली आहे. पुजाच्या आत्महत्येला कारण ठरलेल्याची चौकशी करावी अशी मागणी वानवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसं रितसर निवेदनही देण्यात आलं आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही चौकशीची मागणी करणारं निवेदन भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिलं आहे.
दरम्यान, टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार पुजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सुचना देत असल्याचं समजतं. मात्र, त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचाही खुलासा किंवा माहिती पुजाच्या कुटुंबाने किंवा पोलिसांनी अद्याप दिलेली नाही. पण हे संपूर्ण प्रकरण आता तापत चाललं असून, पुणे पोलीसांनी सविस्तर खुलासा करण्याची मागणीही सोशल मीडियात होत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला