पुन्हा तुकाराम मुंढेंचे पार्सल?

badgeवादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंढे यांना नागपूर महापालिकेत येऊन दोन महिनेही व्हायचे असताना सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी त्यांचे ‘पार्सल’ बांधण्याची तयारी सुरू केली आहे. सध्याचा विसंवाद असाच राहिला तर लवकरच मुंढे यांच्याविरुद्ध भाजपचे नगरसेवक अविश्वासाचा प्रस्ताव आणतील.

कठोर शिस्तीचे अधिकारी म्हणून मुंढे ओळखले जातात. १३ वर्षाच्या नोकरीत आतापर्यंत त्यांची १२ वेळा बदली झाली आहे. ठाणे, नाशिक ह्या सारख्या महापालिकेत तर नगरसेवकांच्या विरोधामुळे देवेंद्र सरकारला काही महिन्यातच मुंढे यांना उचलावे लागले होते. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात सलग तीन निवडणुकांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पण महापालिका नफ्यात आणता आलेली नाही. उत्पन्न वाढवता न आल्याने कर्मचाऱ्यांना पगार वाटण्यापलीकडे काही झालेले नाही. देवेंद्र मुख्यमंत्री होते म्हणून भरपूर अनुदान मिळाले. आता सत्तेचे समीकरण बदलताच महापालिका प्रचंड संकटात सापडली आहे. मुंढे यांनी आल्या आल्या आर्थिक शिस्तीचा दांडा उगारला. सारी नवी कामे थांबवल्याने नगरसेवक बिथरले आहेत.

मुंढे यांची काम करण्याची वेगळी स्टाईल आहे. नगरसेवकांना ते भेटत नाहीत. दोन महिन्यात प्रथमच बुधवारी मुंढे अर्धा तास नगरसेवकांना भेटले. त्यासाठीही वेळ मागून घ्यावी लागली. बसायला खुर्च्या नसल्याने अनेकांनी उभ्या उभ्याच आग ओकली. संवाद ठेवणार नसाल तर विसंवाद वाढेल असा इशारा नगरसेवकांनी दिला. नियमावर बोट ठेवून काम करणारे मुंढे दबणारे नाहीत. त्यामुळे संघर्ष अटळ आहे.

पण पूर्वीप्रमाणे मुंढे यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आता कमी आहे. बदललेल्या राजकीय समीकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंढे यांना नागपूरच्या मिशनवर पाठवले, त्यामागे रणनीती आहे. फडणवीस यांची त्यांच्या गावातच दमछाक करण्याचे डावपेच महाविकासआघाडीने आखले आहेत. मुंढे यांना अभय देऊन नागपूर महापालिकेतले घोटाळे बाहेर काढले जातील. हे निमित्त करून महापालिका बरखास्त करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते. यासाठी दोन्ही काँग्रेसचा दबाव आहे. महापालिका निवडणुकीला दोन वर्षे वेळ असला तरी आतापासूनच तलवारी निघाल्या आहेत.