पारंपरिक साडय़ांना द्या वेस्टर्न लूक….

Western Look

मार्केटमध्ये, मॉलमध्ये साडय़ांचे किमती ड्रेस आपल्याला भुरळ घालतात. मात्र आपण जर आपल्या घरातील कपाटात असणा-या न वापरण्याजोग्या साडय़ा पाहिल्या तर आपणही उत्तमरीत्या अशा प्रकारचे नव्या फॅशन स्वरूपातील ड्रेस शिवून ते सण, लग्न समारंभात वापरू शकतो. यासाठी पैठणी, कॉटनसाडी, बनारसी साडी, मोठय़ा काठाच्या साडय़ा यापासून अनारकली, कुर्तीज बनवू शकतो किंवा वनपीसही चांगला बनवला जाऊ शकतो. साडीचा ड्रेस बनवताना त्यांचा काठ, गोल्डन पदर, हस्तकला आदींचा वापर हातांचं डिझाईन, गळ्याचा भाग, ड्रेसचा घेर आदींसाठी होऊ शकतो. तर लटकनचा वापरही या ड्रेससाठी होऊ शकतो. ब्लॉकलेस, वनपीससाठी बेल्ट आदींचाही वापर येथे होण्यासारखा आहे. साडीपासून अनारखाली ड्रेस हा उत्तमरीत्या होऊ शकतो किंवा घेरदार लेहंगाही. याप्रमाणेच जॅकेट, प्लाझो किंवा वनपीस, शॉर्ट स्कर्ट, टॉप घेरदार स्कर्ट आदींसाठी भरगच्च डिझाईन्सनी भरलेल्या साडय़ांचा उपयोग होऊ शकतो.

हातमागावर विणलेल्या कशिद्याच्या साडय़ा म्हणजे जीव की प्राण असतो प्रत्येकीचा, पण एकदा नेसलेली साडी वारंवार वापरण्याचा तोचतोचपणा दिसून येत नाही. साडय़ांतील व्हरायटी न्याहाळताना जुन्या साडय़ांचा उपयोग कुणाला देऊन टाकण्यापेक्षा वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेस शिवून घेतले तर जुन्याला नवा टच अनुभवास मिळतो. बनारशी शालूंचा उपयोग घोळदार ड्रेससाठी होऊ शकतो. असे ड्रेस समारंभात चांगले उठून दिसतात. सिल्क साडी, जरीकाठाची साडी, साडीचे डार्क रंग, प्रिंटच्या साडय़ा, नऊवारी काठ साडय़ा ड्रेससाठी उपयुक्त ठरतात. पैठणी साडय़ा, आदी साडय़ांपासून हरेक प्रकारच्या कुर्तीज बनवल्या जाऊ शकतात. कुर्तीजचे आज नानविध प्रकार पाहायला मिळतात. विविध डिझाईनच्या कुर्तीज तरुणींना आकर्षित करतात.

कुर्तीजच्या प्रकारांमध्ये प्रिंटेड कॉटन कुर्तीज, लाँग कुर्तीज, हँडवर्क, एम्ब्रॉयडरी कुर्तीज, हाय लो प्रिंटेड कुर्तीज, कॉटन कुर्तीज, प्लाझो, लेगीन कुर्तीज, पटियाला सोबत कुर्तीज, कॉटन अनारकली कुर्तीज, आदी कुर्तीज तरुणींचे आकर्षण बनल्या आहेत. शिवाय साडय़ांच्या माध्यमातून पर्सचे नवनवीन प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत. घरच्या घरीही अशा पर्स बनवल्या जाऊ शकतात. कलरफूल विविध आकाराच्या बॅगा, पर्स आजच्या तरुणींसाठी वापरता येण्याजोग्या ठरणा-या आहेत. परंपरेला नवा टच देऊन साकारल्या जाणा-या कुर्तीज, बॅगा, पर्स आज जुन्याचा नव्याने वेध घेताना तर दिसून येतात, शिवाय परंपरेची नवी झळाळी यानिमित्ताने अनुभवता येते.