परमबीरांच्या ‘त्या’ पत्राला अर्थ नाही, अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही – राष्ट्रवादी

jayant Patil

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवलेल्या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर भाजपनं गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी केलीय. पण परमबीर सिंघ यांच्या पत्राला काहीही अर्थ नाही. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं राष्ट्रवादीने नुकताच स्पष्ट केले आहे. आज सायंकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील झालेल्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी चर्चा करताना स्पष्टीकरण दिले.

राजनाधी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. ही बैठक तब्बल अडीच तास चालली. या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. त्यावेळी पत्रकारांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले असले तरी, त्यांच्या पत्राला काहीही अर्थ नाही, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे अनिल देशमुख यांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली आहे.

सध्या महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएही तपास करत आहे. या चौकशीतून काहीतरी ठोस बाहेर येईल असा विश्वास आहे. जे गुन्हे झाले आहेत त्याबाबत खोलात जाऊन गुन्हे करणाऱ्याचा तपास सुरु आहे. तो तपास लवकरच पूर्ण होईल. गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जो प्रमुख मुद्दा आहे, त्यावरुन लक्ष विचलित करण्याची गरज नाही. अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरच फोकस राहील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. सोबतच फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील अनेकांवर आरोप झाले. त्यांनी कुणालाही राजीनामा द्यायला लावला नाही. पण मी त्या खोलात जात नाही. सध्या जे प्रमुख विषय आहेत त्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते आम्ही होऊ देणार नाही, असंही पाटील म्हणाले.

दरम्यान, सर्वात आधी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, याबाबत आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट करतील. त्याबाबत मी अधिक काही बोलणार नाही. त्यामुळे सध्यातरी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER