परमबीर सिंग यांच्या याचिकेवर हायकोर्टात बुधवारी सुनावणी

Parambir Singh - Mumbai HC - Maharastra Today
Parambir Singh - Mumbai HC - Maharastra Today

मुंबई :- महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कथित भ्रष्टाचाराची आणि पोलिसांच्या बदल्या व तपासामध्ये त्यांच्याकडून केल्या जाणार्‍या हस्तक्षेपाची केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत (Central Bureau of Investigation-CBI) चौकशी केली जावी, यासाठी भारतीय पोलीस सेवेचे (IPS) महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे.

परमबीर सिंंग यांचे ज्येष्ठ वकील विक्रम नानकानी यांनी याचिकेचा मुख्य न्यायाधीश न्या. दीपंकर दत्ता यांच्यापुढे विशेष उल्लेख केला व सुनावणी बुधवारी घेण्याची विनंती केली. मुख्य न्यायाधीशांनी त्यांची विनंती मान्य केली. त्यानुसार मुख्य न्यायाधीश व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होईल. नानकानी यांनी याचिकेवर लगेच सुनावणी घेण्याची विनंती केल्यावर मुख्य न्यायाधीशांनी त्यांना विचारले की, तुम्ही याचिकेत ज्या मागण्या केल्या आहेत, त्यावर न्यायालय आदेश काय देऊ शकेल? याचे समाधानकारक उत्तर सुनावणीच्या वेळी देऊ, असे नानकानी उत्तरले.

परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी आधी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. परंतु उच्च न्यायालयात याचिका करणे अधिक श्रेयस्कर होईल, असे त्या न्यायालयाचे मत पडल्याने सिंग यांनी तेथील याचिका मागे घेऊन मुंबईत याचिका दाखल केली. गृहमंत्री देशमुख यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मर्जीतील पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना १०० कोटी रुपये गोळा करण्याचे ‘टार्गेट’ ठरवून दिले, असा सनसनाटी आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला होता.

त्याच अनुषंगाने राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुल्का यांनीही एक गोपनीय अहवाल पोलीस महासंचालकांना सादर केला होता. शुक्ला यांचा तो अहवाल आणि त्यासंबंधीची गृह मंत्रालयातील फाईल न्यायालयापुढे सादर करण्यास सांगावे, अशी परमबीर सिंग यांची मागणी आहे. तसेच गृहमंत्री देशमुख यांच्या सरकारी निवासस्थानी बसविलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये काही गडबड केली जाऊ नये यासाठी तेही एखाद्या त्रयस्थ संस्थेकडे सुरक्षित ठेवले जावे, अशीही त्यांची याचिकेत मागणी आहे.

परमबीर सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त होते. परंतु त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले हे पत्र माध्यमांमध्ये प्रसिद्ध होऊन सरकारची पंचाईत झाल्यावर सिंग यांना आयुक्त पदावरून हटवून त्यांना गृहरक्षक दलाचे महासंचालक नेमले गेले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली मोटार सापडल्याचे निमित्त करून त्यांची ही बदली केली गेली. परंतु राजकीय सोयीसाठी आपल्याला ‘बळीचा बकरा’ केले गेले, असे सिंग यांचे म्हणणे आहे. त्यांनी याचिकेत आपल्या या बदलीला थेट आव्हान दिलेले नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने  परमबीर सिंग प्रकरणात पोलिसांच्या बदल्यांच्या संदर्भात दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याचा आदेश सरकारला द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button