परमबीर सिंह यांचा ‘लेटरबॉम्ब’ : पवारांचीही चौकशी करा; उच्च न्यायालयात दुसरी याचिका

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या ‘लेटरबॉम्ब’ (Letterbomb) संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचीही चौकशी करा, अशी मागणी करणारी आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेत म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी ९० वर्षीय निवृत्त आयपीएस अधिकारी जुलियो रिबेरो यांच्यामार्फत करा, असा सल्ला देण्यामागे शरद पवारांचा नेमका हेतू काय होता?

ही दुसरी याचिका घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा ईडीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्याची व दरमहा १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने पीएमएलए अंतर्गत सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या संपत्तीवर जप्तीचीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

जयश्री पाटील यांची याचिका

कथित दरमहा शंभर कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र यासंदर्भात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. राजकीय दबावापोटी पोलीस कारवाई करीत नसल्याने याप्रकरणाची सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेद्वारे तपास करण्याची मागणी करत फौजदारी याचिका जयश्री पाटील यांनी हायकोर्टात दाखल केली आहे.

परमबीर सिंह यांनी पत्रात उल्लेख केलेल्या दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात यावेत अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच सिंह पोलीस विभागाच्या सर्वोच्च पदाचा कार्यभार वर्षभर सांभाळत होते आणि तरीही त्यांनी या प्रकारावर भाष्य अथवा कायदेशीर कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्याही कामाचा तपास करा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवून स्वतंत्र तपास यंत्रणेला तपास करण्याचे निर्देश द्या, अशी प्रमुख मागणीही याचिकेत केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER