…म्हणूनच नवनीत राणा उद्धव ठाकरेंचा द्वेष करतात; अरविंद सावंतांनी आरोप फेटाळला

Maharashtra Today

मुंबई : शिवसेना खासदार अरविंद सावंत(Arvind Sawant) यांनी लोकसभेच्या लॉबीत आपल्याला धमकी दिल्याचा आरोप अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana)यांनी केला आहे.खासदार राणा यांनी केलेल्या आरोपांना सावंत यांनी उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेवर (Shivsena)त्यांचा राग असण्याच्या कारणांचाही त्यांनी उलगडा केला.

अरविंद सावंत म्हणाले, हे खोटं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की, त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. त्यांना समजावून सांगत असतो. पण, त्यांना धमकावलं हे साफ खोटं आहे. उलट त्याच (नवनीत राणा) सगळ्यांना धमकावत असतात. तुम्ही जर बघितलं, तर जेव्हा केव्हा त्या सभागृहात महाराष्ट्र सरकारविषयी वा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याविषयी बोलतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून तुम्हाला दिसेल, त्या खूप द्वेष करतात. तिरस्कार करतात. मी आयुष्यात कधीही कुणाला धमकावलं नाही. महिलांना धमकावण्याचा प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. महिलांना धमकावेल का? असे सावंत म्हणाले.

आज सभागृहात झाल्याचे त्यांचे काही म्हणणं आहे. तर आज महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्यासाठी भाजपाचे खासदार बोलत होते. त्यामुळ आम्ही लोकसभा अध्यक्षांच्या समोरील हौद्यात (वेल) गेलो होतो. घोषणा देत होतो. जाताना मी जर त्यांना असं बोललो, तर मी तिथं थांबायलाही हवं होतं ना. त्यांच्या आजूबाजूला लोकं बसलेली असतात. त्यांना विचारावं. अशी भाषा मी वापरेल का? माझ्याकडून असे आयुष्यात होणार नाही. त्या एक महिला आहेत. अशी कामं आम्ही करत नाही, असे सावंत म्हणाले.

उलट त्यांना अशी सवयच आहे. त्या ज्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. तिथे पूर्वी शिवसेनेचे खासदार होते, आनंदराव आडसूळ. त्यांनी त्यांच्यावर (नवनीत राणा) गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यामुळे त्यांच्या मनात राग आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून तो गुन्हा दाखल केलेला आहे. ते आता न्यायालयात आहे. त्यामुळे त्या सातत्यानं जेव्हा केव्हा बोलतात त्या उद्धव ठाकरे यांना अवमानित करतात. मी त्यांना अनेक वेळा बोललोय की, कुणावरही वैयक्तिकरित्या किंवा नाव घेऊन टीका करत जाऊ नका. आजही बघा. सभागृहात कुणाचंही नाव घ्यायचं नाही म्हणून सभागृहात टोकलं जातं. कारण ते नोंदलं जातं. हे सगळं बघितलं की वाईट वाटतं. मी कधीही महिलांना धमकावलं नाही. लोक सरळ सरळ खोटं बोलू शकतात, याचंही मला आश्चर्य वाटतंय. काही लोकांकडे कौशल्य असते की, एखाद्या गोष्टीवरून प्रसिद्ध मिळवणं. त्यांचा मागील एक दीड वर्षांचा काळ बघा. अॅसिड फेकण्याचं कृत्य कधीच करणार नाही, पण जर कुणी करत असेल, तर मी नवनीत राणांच्या बाजूने उभा राहिले, असे म्हणत अरविंद सावंत यांनी आरोप फेटाळून लावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER