पंकजांचे ट्विट अन् त्याचा राजकीय अर्थ काय?

Pankaja Munde

भाजपच्या (BJP) नेत्या, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे कालचे ट्विट सोशल मीडियात खूपच चर्चेत आहे. आपले वडील गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी राजकीय हयातीत ज्यांना टक्कर दिली आणि नामोहरम करून सोडले त्या शरद पवारांबद्दल (Sharad pawar) ‘हॅट्स आॅफ’ पवारसाहेब! अशी प्रशंसा करणारे ट्विट पंकजा यांनी केले. ‘हॅट्स आॅफ पवारसाहेब. कोरोनाच्या परिस्थितीतही इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिन्याचे अप्रूप वाटते’ असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. पवार यांचे राजकारणातील एक वारसदार म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते त्या आमदार रोहित पवारांनी पंकजा यांच्या ट्विटला प्रतिसाद देत मग ट्विट केले. ‘धन्यवाद ताई! राजकारणातील दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रातच दिसते.’ असे रोहित पवार (Rohit pawar) म्हणाले. रोहित हे कर्जत-जामखेडचे आमदार आणि पवारसाहेबांचे नातू आहेत. आता पंकजा यांच्या ट्विटचा राजकीय अर्थ सोशल मीडियात लावला जात आहे. अनेक जण सुतावरून स्वर्ग गाठण्याचे काम करीत आहेत. राष्ट्रवादीने पंकजा यांच्यावर जाळे टाकले असल्याचे बोलले जात आहे. पंकजा तसे कोणतेही पाऊल कधीही उचलणार नाहीत. पवार, राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांनी राजकारणात जो त्रास दिला तो त्या विसरतील असे कधीही होणार नाही.

१९९० नंतरच्या महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार यांच्यासारख्या बड्या नेत्याला हेडआॅन घेण्याचे काम केले ते भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी. १९९५ मधील युती सरकारच्या शिल्पकारांपैकी मुंडे एक होते. शरद पवार यांच्याशी पंगा घ्यायला तेव्हा कोणी सहसा धजावत नव्हते. पवार कोणाचा केव्हा काय निकाल लावतील अशी धास्ती भल्याभल्यांना असायची. मुंडेंनी माधवं प्रयोग केला. माधवं म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी- अशी बहुजन समाजाची मूठ त्यांनी बांधली आणि त्या भरवशावर भाजप गावागावांत नेला. प्रस्थापितांना गदागदा हलविले. असे म्हणतात की आपल्याला अनेकदा राजकीयदृष्ट्या अडचणीत आणणाऱ्या मुंडेंचे घर पवार यांनी जाणीवपूर्वक तोडले. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत नेले आणि मुंडे कुटुंब फुटले. पवारांचे राजकारण बेभरवशाचे आहे, असे मुंडे नेहमीच म्हणायचे.

२०१४ मध्ये ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले आणि लगेच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर पंकजा, धनंजय एकत्र येतील अशी काहींना आशा वाटली. पण तसे काही घडले नाही. दोघांमधील दरी वाढत गेली आणि शेवटी परळीच्या मैदानात धनंजय विधानसभेला बहिणीविरुद्ध लढले व जिंकले. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पंकजा यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. विधान परिषद, राज्यसभाही मिळाली नाही; पण अलीकडे भाजपचे राष्ट्रीय सचिवपद देऊन त्यांचे पुनर्वसन पक्षाने केले. पंकजा स्वत: बड्या साखर कारखानदार आहेत. वडिलांचे कारखाने त्या समर्थपणे चालवीत आहेत. त्याच वेळी त्या ऊसतोडणी कामगारांच्याही नेत्या आहेत. या कामगारांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार भगवान गडाच्या साक्षीने त्यांनी दोन दिवसांपूर्वीच बोलून दाखविला. मंगळवारी शरद पवार यांनी पुण्यात या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेतली, काही चांगले निर्णयही घेतले. पंकजा आणि धनंजय या बैठकीत आजूबाजूला बसलेले दिसले. त्यावरून मग सोशल मीडियात चर्चा सुरू झाली की दोघे एकत्र येणार का?

अलीकडे महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अडीच डझन साखर कारखान्यांना ४०० कोटी रुपयांची हमी दिली. ही हमी दिली नसती तर या हंगामातील गाळपच सुरू होऊ शकले नसते. या कारखान्यांमध्ये पंकजा मुंडे यांचाही कारखाना होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये साखर कारखाने, त्यांना द्यावयाची हमी, सहकारी बँकांचे राजकारण याबाबतचे निर्णय शरद पवार यांच्या संमतीशिवाय होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येच्या कारखान्याला पवारांच्या आशीर्वादाने आणि भक्कम पाठिंब्याने चाललेल्या सरकारने कोट्यवधी रुपयांची हमी दिली. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न सोडविल्याबद्दल त्यांनी पवारसाहेबांचे आभार मानले आहेत.

काही वर्षांपूर्वी धनंजय यांना आपल्या पंखाखाली घेणारे शरद पवार आता पंकजा यांना पंखाखाली घेऊ पाहात आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच बीड जिल्ह्यातील भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस आणि पंकजा यांच्यात खटके उडत असल्याच्या आणि धस यांच्या माध्यमातून पंकजा यांना अडचणीत आणले जात असल्याच्याही बातम्या आहेत. भगवान गडाच्या साक्षीने पंकजा यांनी केलेल्या भाषणाचीही जोरदार चर्चा होत आहे. ‘अभिमन्यूला चक्रव्यूह भेदत आत जाता आलं, पण बाहेर पडता आलं नाही. आमचा कोणी अभिमन्यू करायचा प्रयत्न केला तर त्यांनी हे लक्षात ठेवावं की आम्हाला बाहेरही पडता येतं.’ असे सूचक उद्गार पंकजा यांनी काढले. पंकजा बंडखोरीच्या पवित्र्यात तर नाहीत ना? त्यांना खेचण्याचा प्रयत्न पवारसाहेब करीत आहेत का? तसे प्रयत्न झालेच तरी पंकजा यांची भाजपवरील निष्ठा इतकी तकलादू नक्कीच नाही. वडील, मामा प्रमोद महाजन यांच्या संघ-भाजप संस्कारातून त्या पुढे आलेल्या आहेत. एक मात्र नक्की की पंकजाताईंमध्ये नेतृत्वाचे १० गुण आहेत. त्या रणरागिणी आहेत. घाईगर्दीत त्या कुठलाही निर्णय घेणार नाहीत. वडिलांची पुण्याई, त्यांचा वारसा आणि भाजपवरील अविचल निष्ठा या मार्गानेच त्या प्रवास करीत राहतील यात शंका नाहीच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER