पंकजाताई नाराजीपेक्षा आत्मपरीक्षण आवश्यक

भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सध्या अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जो हल्लाबोल चालविला आहे तो चालू ठेवण्याऐवजी त्यांनी आत्मपरीक्षण केले तर अधिक उत्तम होईल. ही पंकजा यांच्या विरोधकांची नाही तर माझ्यासारख्या मुंडे साहेबांच्या चाहत्यांचीही इच्छा आहे. आत्मपरिक्षण करायचेच तर त्यांना मागे जावे लागेल, इतिहास तपासावा लागेल आणि त्याची प्रामाणिक उत्तरे स्वत:ला द्यावी लागतील. त्यांनी तसे केले तर आगामी राजकीय वाटचाल यशस्वी होईल पण गैरसमजांची त्यांनी बांधलेली इमारत तशीच ठेवली तर ती कोसळेल आणि त्या कोसळलेल्या इमारतीखाली पंकजा यांचे राजकीय भवितव्य दबले जाईल, अशी भीतीही त्यांच्या चाहत्यांना वाटते.पंकजा यांना त्यांचे वडील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणात आणले. त्यापूर्वी त्या कधीही राजकारणात सक्रिय नव्हत्या. २००९ मध्ये वडिलांचे बोट पकडून आमदार झाल्या आणि वडिलांच्या राजकीय वारसदार बनल्या. मुंडे साहेबांबरोबर सावलीसारखे राहिलेले त्यांचे पुतणे धनंजय हे त्यांना डावलल्याने कमालीचे नाराज झाले आणि त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. आपल्यात सगळे नेतृत्वगुण आहेत, अनुभव आहे आणि मेहनत करण्याची तयारी आहे, तरीही आपल्याला मुंडे साहेब डावलत असल्याचे लक्षात आल्यानंतर आणि आता पंकजा यांनाच राजकारणात काका पुढे करतील हे लक्षात आल्यानंतर धनंजय यांनी स्वत:चा निर्णय घेतला आणि भाजप सोडून ते राष्ट्रवादीत गेले व त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी शरद पवार यांची साथ सोडलेली नाही.धनंजय हे मुंडे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारे म्हणून आधी परळी, बीडमध्ये आणि विशेषत: वंजारी समाजामध्ये खलनायक होते. काही गावांमध्ये तर त्यांना येऊ दिले जात नव्हते. २०१४ च्या निवडणुकीत धनंजय यांचा पंकजा यांनी पराभव केला. धनंजय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तर पंकजा ग्रामविकास व महिला तसेच बालकल्याण मंत्री बनल्या. दोघा भावाबहिणींमध्ये विस्तवही जात नव्हता आणि आजही तशीच स्थिती आहे. पण बीड जिल्ह्यात एकेकाळी खलनायक अशी प्रतिमा असलेले धनंजय यांनी जनसामान्यांशी आपली नाळ जोडली, त्यांचा विश्वास संपादन केला. धनंजय यांना पाहिल्याबरोबर, ‘मुंडे साहेबांशी गद्दारी करणारा हाच’ असा संताप बीड जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे समर्थकांमध्ये निर्माण व्हायचा. मात्र, एकेक करत स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये धनंजय यांनी शिरकाव केला. लोकांचा विश्वास संपादन केला. दुसरीकडे पंकजाताई आणि परळीवासियांमध्ये अंतर निर्माण होत गेले. महादेवापेक्षा नंदीच जास्त भाव खातात तसे त्यांच्याभोवतीचे लोक हे अंतर निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. ताई परळीच्या घरात वर बसून असायच्या आणि माईकवर अनाऊन्समेंट करून एकेकाला भेटीला बोलविण्याची राजेशाही पद्धत होती म्हणतात.समर्थकांना,चाहत्यांना मुंडेसाहेब एकेरीत बोलत, अनेकदा रागवत पण त्यांची शिवीही चाहत्यांना ओवीसारखी वाटायची. त्याच पद्धतीने पंकजाही बोलतात पण त्यात आपलेपणाऐवजी उद्दामपणा जाणवतो, असे कार्यकर्ते सांगतात. पंकजा यांच्यातील याच सगळ्या उणिवा धनंजय यांनी नेमक्या ओळखल्या आणि त्यांनी लोकांच्या मनाचा ठाव घेतला. अलिकडच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांचा त्यांनी तीस हजारावर मतांनी पराभव केला. हा पराभव एका रात्रीतून झालेला नाही. एकेकाळी खलनायक असलेले धनंजय हीरो बनले. देवेंद्र फडणवीस वा अन्य कोणीही त्यांचा पराभव केला नाही तर पंकजा यांनीच स्वत:चा पराभव केला आहे. मतदारसंघाशी असलेली नाळ तुटली, मंत्रालय, मुंबईत आणि स्वत:च्या भावविश्वात पंकजा अधिक रमल्या आणि त्यांचे नुकसान झाले असे विश्लेषण बीडमधील संतुलित रिपोर्टिंग करणारे पत्रकार देतात. अजूनही पंकजा यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे हे पत्रकार सांगतात.मूठभर लोकांच्या हाती भाजप देऊ नका असे सांगताना पंकजा यांनी तो ब्राह्मणांच्या हाती एकवटला आहे असे सूचित केले आणि त्यांचा रोख केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होता हे दुधखुळं मुलही सांगेल. मुळात ज्या फडणवीस यांच्यावर त्या तोफ डागत आहेत त्यांचा पंकजा यांच्या राजकीय जीवनात सिंहाचा वाटा आहे. २०१४ मध्ये जेव्हा मंत्र्यांच्या खातेवाटपाचा प्रश्न आला तेव्हा पंकजा यांना केवळ ग्रामविकास खाते द्यावे, असे फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले होते. मात्र, फडणवीस यांनी हट्ट धरुन पंकजा यांना ग्रामविकास, महिला व बालकल्याण आणि जलसंधारण अशी महत्त्वाची खाती दिली. भाजपच्या राज्य कोअर कमिटीमध्ये पंकजा यांचा समावेश झाला तो केवळ आणि केवळ फडणवीस यांच्या आग्रही भूमिकेनेच. असे असूनही मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, फडणवीस हे तर शहरी नेते, अशी वाक्ये पंकजा यांनी उच्चारली आणि स्वत:मध्ये व फडणवीसांमध्ये त्यांनी एक अंतर तयार करुन घेतले.२००९ च्या निवडणुकीत संपूर्ण मराठवाड्यात परळी (पंकजा मुंडे) आणि उद्गीर (सुधाकर भालेराव) असे दोनच भाजप आमदार निवडून आलेले होते आणि त्यावेळी पक्षाची सर्व सूत्रे ही गोपीनाथ मुंडे यांच्या हाती होती. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस अनुक्रमे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री असताना पक्षाच्या मराठवाड्यातील यशाचा ग्राफ कमालीचा वाढला. हे पक्ष मूठभर लोकांच्या हातात असल्याचे लक्षण मानायचे की पूर्वी विशिष्ट नेत्यांच्या हाती असल्याने पक्षाचे नुकसान झाले असे म्हणायचे? ज्याचे विश्लेषण त्याने करावे.ज्या नेत्यांच्या भरवश्यावर पंकजा या आता राज्यभरात आंदोलनाची मशाल पेटवू पाहत आहेत त्यांच्यात काय दम राहिलाय? एकनाथ खडसे हे त्यांच्या मुलीचा त्यांच्याच मुक्ताईनगर मतदारसंघात पराभव टाळू शकलेले नाहीत. तिकिट कापण्यात आलेले मुंबईतील भाजपचे नेते प्रकाश मेहता यांची सद्दी संपून मनोज कोटक,पराग शहांसारखे नव्या दमाचे लोक ईशान्य मुंबईत आलेले आहेत. माजी मंत्री विनोद तावडे हे सावधगिरी बाळगणारे नेते आहेत, पंकजांसोबत जाऊन ते पक्षनेतृत्वाची नाराजी ओढावून घेणार नाहीत. तेव्हा पंकजाताई सावध व्हा, ऐका चाहत्यांच्या हाका…