राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चोख उत्तर – पंकजा मुंडे

बीड : माझी बदनामी करून, राजकारणातून संपविण्याची सुपारी घेणाऱ्यांनी कितीही कागद नाचवले, तरी त्यात काही तथ्य नाही हे आज सिद्ध झाले आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.चिक्की घोटाळ्याप्रकरणी एसीबीने क्लीनचिट दिल्यानंतर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर हल्ला चढवत हे वक्त्यव्य केले आहे.

“मी कोणत्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेतले नाहीत. टेंडरिंग रेट, करारांचा प्रारूप अस्तित्वात असतांना निविदा काढल्या. सुप्रीम कोर्टानेदेखील आमची निविदा योग्य असल्याचे सांगितले होते. मात्र माझ्या राजीनाम्यासाठी कागदी घोडे नाचवणाऱ्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं उघड झालं आहे”, असं पंकजा मुंडेंनी आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे.

ज्या चिक्कीचे वाटपच झाले नाही, त्या चिक्कीवरुन माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. चिक्कीचे सॅम्पलस तपासणीसाठी देशातल्या वेगवेगळ्या पंधरा ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या, त्याचा अहवाल देखील चांगला आल्याचं पंकजा म्हणाल्या.

विरोधी पक्षनेत्यानेही आमच्या विरुद्ध तक्रार केली होती. मात्र आज लाचलुचपत प्रतिबंध विभागाला यात काहीच आढळून आलं नाही. मी कोणत्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेतले नाहीत, असा दावा पंकजा मुंडेंनी केला आहे.