मराठवाड्यातील पक्षबांधणी मोहिमेतून पंकजा मुंडेंना वगळले

Pankaja Munde

औरंगाबाद : माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले खरे पण, अजूनही पंकजा मुंडेंना भाजपत जे स्थान मिळायला पाहिजे ते अद्याप मिळालेले नाही.

मुळात राष्ट्रीय सचिवपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे महाराष्ट्रातील राजकीय वजन वाढायला हवे होते. पण राज्य तर सोडाच मराठवाड्यातही पंकजा मुंडे यांना पक्षबांधणीच्या कार्यक्रमापासून दूर ठेवले जात आहे. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षबांधणीसाठी मराठावाड्यात सक्रिय झाले आहेत. ते एकटेच मराठवाड्यात बैठका घेत आहेत. परंतु, मराठवाड्यात पंकजा मुंडे यांची मोठी राजकीय ताकद असताना त्यांना पक्षबांधणीच्या कार्यक्रमापासून दूर का ठेवले जात आहे, अशी शंका निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राष्ट्रीय सचिवपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले होते. मात्र, हे राजकीय पुनर्वसन केवळ तोंडदेखलेच आहे की काय, अशी शंका आता येऊ लागली आहे. कारण, भाजपमधील काही नेत्यांकडून अजूनही पंकजा मुंडे यांचे पद्धतशीरपणे पंख छाटण्याचे काम सुरुच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या सगळ्यावर पंकजा मुंडेही नाराज असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रीय सचिवपदी निवड होऊनही मराठवाड्यातील पक्षबांधणी कार्यक्रमात आपण दुर्लक्षित राहिल्याची बाब पंकजा यांना फारशी रुचलेली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आपला नियोजित औरंगाबाद आणि मराठवाडा दौरा पुढे ढकलला होता.

तसेच चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादमध्ये आयोजित केलेल्या बैठकीलाही पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नव्हत्या. पंकजा मुंडे यांच्या गटातील नेतेही या बैठकीपासून दूर राहिले नव्हते. मात्र, चंद्रकांत पाटील किंवा इतर नेत्यांकडून त्याची फारशी दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपमध्ये अजूनही दुर्लक्षित असल्याची चर्चा नव्याने रंगू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER