पंकजा मुंडे म्हणाल्या, बीडमधील सर्व उमेदवारांना गुलाल लागल्याशिवाय फेटा बांधणार नाही

Pankaja Munde

बीड : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी यापूर्वीच केलेला निश्चय पंकजा मुंडे यांनी आज आष्टीमध्ये परत बोलून दाखवला. त्या म्हणाल्या बीडमधील सर्व उमेदवारांना जोपर्यंत गुलाल लागणार नाही. तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही. त्यामुळे अमोल कोल्हे विरुद्ध पंकजा मुंडे असा शाब्दिक सामना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नमिता मुंदडा आणि धनंजय मुंडे यांच्या प्रचारादरम्यान असाच निश्चय व्यक्त केला होता.

कोल्हे म्हणाले होते, केज आणि परळीचा आमदार हा राष्ट्रवादीचा होणार नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नमिता मुंदडा या राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये डेरेदाखल झाल्या आहेत.

या सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर सडकून टिका केली. माझ्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. हे काही नवीन नाही. गोपीनाथ मुंडे असतानादेखील सगळ्यांचे लक्ष लागायचे. राष्ट्रवादीची लोक खोटा प्रचार करतात की पंकजा मुंडेना भिती वाटते. मी महाराष्ट्रभर प्रचार करुन माझा मतदारसंघ सांभाळते. मला महाराष्ट्राची चिंता आहे केवळ माझ्या मतदारसंघाची नाही.

पंकजा यांनी आष्टी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलत असताना फेट्याबद्दलच्या निश्चयाचा पुनरुच्चार केला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुरेश धस, आमदार भीमराव धोंडे, यांची उपस्थिती होती. पाच वर्षात पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात कारभार नाही तर संसार केला, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. धनंजय मुंडेंसारखे कर्तृत्ववान नेते राष्ट्रवादीत गेल्यामुळे राष्ट्रवादीचा भोपळा झाला आहे, अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली.