
औरंगाबाद : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही आपल्या दुस-या पत्नी बद्दल खुलासा करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर सर्वात पहिले राज्याचे लक्ष हे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रतिक्रियेकडे लागले होते. मात्र, अनेक दिवस पंकजा मुंडे यांनी या प्रकरणावर बोलण्याचे टाळल्याने पंकजा मुंडे गप्प का असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला होता. त्या अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आता पंकजा मुंडे अखेर या प्रकरणावर बोलल्या आहेत.
”तो विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे. तरीही याच्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आलाच आहात, तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करू शकत नाही”, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्यात.
तसेच पंकजा मुंडे या संपुर्ण प्रकरणाबाबत धनंजय मुंडे यांच्या मुलांबाबत भावूक झालेल्याही दिसल्या. पंकजा म्हणाल्या, “कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा कुटुंबात ज्यांचा काही दोष नाही, त्या कुटुंबातील मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. मी महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशीलतेने बघते. हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं. आणि आताही करणार नाही. यात संवेदनशील पद्धतीनं विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला