पंकजा मुंडेंना आमदारकी; आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता !

Pankaja Munde

मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांचं भाजपाकडून राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. पंकजा यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सध्या सुरू आहे. राज्यातल्या भाजपा नेत्यांमध्ये याबद्दल एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नवी मुंबईत आजपासून भाजपाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात पंकजा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. एप्रिलमध्ये विधान परिषदेच्या आठ जागा रिक्त होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून नावांची चाचपणी सुरू आहे. याशिवाय इच्छुकांचीदेखील मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपाकडे जास्त संख्याबळ असल्यानं त्यांना काही उमेदवारांना सहज विधान परिषदेवर पाठवता येतील. त्यामध्ये पंकजा यांचं नाव पुढं असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजपाच्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांसोबत शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीत महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे.

आजपासून नवी मुंबईत भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन