‘राष्ट्रवादीचा पाठिंबा घेताना पंकजाताईंना विश्वासात घेतलं का?’ प्रीतम मुंडे यांचा सवाल

बीड :- उद्या गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांचा जयंती कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात पंकजा मुंडे जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टवरून केले आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या राज्यातील कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मीडियामध्ये सुरू केलेल्या मोहिमेमुळे मुंडे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडेंनीही वेट अँड वॉच असेच म्हटले. तसेच, पंकजा मुंडेच उद्या भूमिका जाहीर करतील, असेही त्यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत : चंद्रकांत पाटील 

पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या बातम्या, त्यानंतर गोपीनाथ मुंडे जयंती कार्यक्रमाच्या पोस्टर्सवरून कमळ वा भाजपचे नाव नसणे यावरून पंकजा मुंडे नाराज असण्याच्या चर्चांना अधिक वाव मिळाला. त्यामुळे त्या पक्षावर नाराज आहेत का अशी सतत त्यांना विचारणा होत आहे. मात्र, पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.

पंकजांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश

दरम्यान, प्रीतम मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात संघर्षयात्रा काढली. राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात महाराष्ट्र पिंजून काढला. त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपने राज्यात सरकार स्थापन केले होते. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेताना, पंकजा मुंडेंना विश्वासात घेतलं होतं का? असा प्रश्न भाजपच्या खासदार प्रीतम मुंडेंना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतील काही निर्णय, बातम्या बाहेर लीक करता येत नाहीत, असे प्रीतम यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : पंकजा मुंडेच्या मनात काय आहे? परळीतील सर्व बॅनरवरून कमळ आणि भाजपचा उल्लेख टाळला!

तसेच, मुंडेंसाहेबांच्या संस्काराप्रमाणेच आम्ही लोकांमध्ये जाऊन कामं करतो, तसंच आम्ही पक्षातील कामासंदर्भातही खूप प्रोफेशनल आहोत. जसं की, कोअर कमिटीच्या बैठकीला मी जाऊ शकत नाही, तसं या बैठकीतील बातम्याही ते बाहेर लीक करू शकत नाही. पक्षातील संसदीय कामकाजाचा आम्ही सन्मान करतो. त्याचा अवमान होईल, असं कुठलंही कृत्य आम्ही करत नाही. मी बहीण आहे म्हणून घरी येऊन त्या माझ्याशी कोअर कमिटीच्या बैठकीतील मुद्द्यांची चर्चा करतील, एवढं इनमॅच्युरल वातावरण आमच्याकडे नाही. दरम्यान, आपल्याला विचारलेल्या प्रश्नावर सावधगिरीने उत्तर देताना, थोडंसं राजकारण तर मी शिकलेच असेल, दुसरी टर्म आहे खासदरकीची, असेही प्रीतम मुंडेंनी म्हटले आहे.