पंकजाच्या मदतीला धनंजय मुंडे, वैद्यनाथला मिळाली १० कोटी ७७ लाखांची थकहमी

Pankaja Munde - Dhananjay Munde

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील परळी येथील माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ कारखान्याला थकहमी मिळावी यासाठी चक्क त्यांचे राजकीय विरोधक व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मदत केली. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत थकहमीच्या विषयावर खुद्द धनंजय मुंडे यांनी आग्रह धरला आणि १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी मिळवून दिली. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील या कारखान्याला मदत करावी अशी भूमिका घेताना साखर कारखान्याच्या विषयात राजकारण आणणार नसल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगत आता तरी शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे पैसे देऊन ‘वैद्यनाथ’ सांभाळावा असा टोलाही त्यांनी लगावला.

बीड जिल्ह्यातील भाजपचे (BJP) दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी उभारलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची धुरा भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी पगारासाठी उपोषण केले. तसेच एफआरपी प्रमाणे पैसे मिळाले नसल्याने कारखाना आर्थिक अडचणीत आला असल्याचे समोर आले होते. महाविकास आघाडीने राज्यातील ३२ साखर कारखान्यांना थकहमी देण्याचा निर्णय घेतला असून त्यात वैद्यनाथ साखर कारखान्याला १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करून धनंजय मुंडे यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली. पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी कारखान्याला थकहमी मिळावी यासाठी आग्रही मागणी केली. राजकीय विरोध बाजूला ठेवून धनंजय मुंडे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

दिवंगत गोपीनाथराव मुंडे व दिवंगत पंडित अण्णा मुंडे यांच्या प्रयत्नातून वैद्यनाथ कारखान्याचा आशिया खंडात लौकीक झाला. या कारखान्यातील कर्मचाऱ्यांवर वेतनासाठी उपोषणाची वेळ यावी, हे दुर्दैवी आहे. राज्य सरकारने दिलेल्या थक हमीचा कारखाना प्रशासनाने योग्य वापर करून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे हित जोपासावे, थकीत बिले आणि पगार करावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावर्षी कारखाना गळीत हंगाम सुरू होऊन परिसरातील १००% उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. भविष्यात कधीही वैद्यनाथ कारखान्यासंबंधी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास राज्य सरकारच्या माध्यमातून ती करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, या थकहमीवरून धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रयत्नामुळे ही थकहमी मिळाल्याचा दावा केला आहे. तर वैद्यनाथ साखर कारखान्याला मिळालेली थकहमी ही आपल्या पाठपुराव्यामुळे मिळाली आहे, असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने राज्यातील ३२ साखर कारखान्यांना थकहमी मंजूर करण्याचा निर्णय घेतला. कारखान्यांची यादी यापूर्वीच जाहीर झाली होती, या यादीत वैद्यनाथ कारखानाही होता. या कारखान्याला थकहमी मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व साखर कारखाना संघाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचेच फलित म्हणून सरकारने कारखान्याला थकहमी देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER