पंकजा व धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर, मात्र ऐकमेकाशी बोलले नाहीत

Pankaja and Dhananjay Munde

बीड : पर‍ळी विधानसभा मतदारसंघातील पराभवानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे संत वामनभाऊ यांच्या ४४ व्या पुण्याथितीनिमित्त पहिल्यांदा एका कार्यक्रमात एका व्यासपीठावर आमने-सामने आले. विधानसभा निवडणुकीत परळीतून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या  होत्या, वादही झाले होते. दोघांमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे दोनही नेते एकत्र आल्याने सगळ्यांचे लक्ष त्याकडे लागले होते.

दोघांनीही आपल्या भाषणात नाव न घेता कोपरखळ्या मारल्या. यावेळी खासदार प्रीतम मुंडे याही उपस्थित होत्या. विधानसभा निवडणुकीत परळीतल्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. दोनही नेत्यांनी आपली सर्व शक्ती आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. या निकालाची चर्चा सर्व राज्यभर झाली होती. गेली पाच वर्षे  मंत्री म्हणून पंकजा गडावर येत होत्या. यावेळी धनंजय मुंडे हे मंत्री म्हणून आले होते. भगवानगडाच्या मेळाव्यावरून काही वर्षांपूर्वी मोठा वाद झाला होता.

हे भांडत का नाहीत?

पंकजा  आणि धनंजय  व्यासपीठावर एकत्रच असले तरी अंतर राखून होते. दोघांमध्ये फक्त नजरा नजर झाली; मात्र ते एकमेकांशी बोलले नाहीत. त्यांच्यात बातचीत होते का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.