पंकजा समोरच धनंजय मुंडे म्हणाले, ‘या मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर घेतो’!

बीड : राज्याच्या राजकारणातील दोन बडे चेहरे, बहीण भाऊ म्हणजेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) हे दोघेही आज एकाच मंचावर आले. एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले दोन्ही नेते गहिनीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमादरम्यान एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही उपस्थितांना संबोधित केलं. पंकजा मुंडे मंचावर असताना धनंजय मुंडे यांनी भाषण केलं. या मतदारसंघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतो, असं धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव केला. खरंतर पंकजा मुंडे परळी या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करत होत्या. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी तत्कालिन महिला बालकल्याण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्याकडे या मतदारसंघाचं नेतृत्त्व आलं आहे.

गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाच्या मंचावरुन धनंजय मुंडेंनी या मतदारसंघाचं नेतृत्त्व आपल्या खांद्यावर घेण्याचं भाष्य केलं, त्यामुळे दोन्ही भाऊ-बहीण एकाच मंचावर आले असले, तरी राजकीय कुरघोडी केल्याचे अखेर दिसून आलेच.

संत वामनभाऊंवर, गडांच्या भक्तांवर, या सर्वांवर आपण असंच प्रेम आणि आशिर्वाद ठेवा. या गडाची, या मतदारसंघाची आणि बीड जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने माझ्या खांद्यावर घेतो. अनेक वर्ष आपला जिल्हा पिछाडीवर आहे. आपल्या जिल्हाला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून संबोधलं जातं. मात्र येणाऱ्या या चार वर्षात जिल्ह्याच्या समोरचं मागासलेपण हटवून, ऊसतोड मजुरांचा नाही तर ऊस पिकवणाऱ्यांचा जिल्हा अशी ओळख देण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे, पुण्यतिथीच्या पूजेचं, या पवित्र पूजेची जबाबदारी जी तुम्ही दिली, आयुष्यात माझ्यासाठी सर्वात मोठं पद कोणतं असेल तर ती पुण्यतिथीची पूजा आहे, ती मला आज या गडातून मिळालं. यापेक्षा जास्त काही बोलणार नाही. माजी पालकमंत्री म्हणाल्या आता आमची जबाबदारी विकासाची आहे आणि त्यासाठी शुभेच्छा पण दिल्या. त्यांना अनेक वर्षे आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील असा विकास करू, असा टोमणा धनंजय मुंडे यांनी पंकजांना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER