पांडुरंग तर गेला, पण काळ सोकावेल….

pandurang.jpg

Shailendra Paranjapeपत्रकार पांडुरंग रायकर ४२ व्या वर्षी गेले. त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. फील्डवर जीव धोक्यात घालून रोजच्या रोज आपलं कर्तव्य बजावणारे अनेक पत्रकार अक्षरशः जिवाचं रान करत होते पण त्या सर्वांची मेहनतदेखील क्रूर व्यवस्थेच्या अनास्थेपुढं फिकी ठरली.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी त्या गाजलेल्या जम्बो कोविड सेंटरमधे ससून रुग्णालयातले सत्तर व्हेंटिलेटर्स त्वरित हलवावेत, असे आदेश आज दिले. मात्र सत्तर व्हेंटिलेटर हलवणे शक्य नाही, असं सांगून तीस व्हेटिलेटर्स हलवण्याची तयारी सरकारी ससून रुग्णालयानं दर्शवलीय.

हे जम्बो कोविड सेंटर दोन दिवसात सुरू होईल असं पालकमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन कार्यक्रमात सांगितलं होतं. गेल्या मंगळवारी रात्रीपर्यंत तेथे तीन रुग्ण दाखल झाले होते आणि त्यांनाही नीट लक्ष दिले जात नाही, हा अनुभव होता. तशा स्थितीत स्थानिक वृत्तपत्रांनी या जम्बो कोविड सेंटरची लक्तरं वेशीवर टांगली होती. म्हणजे जम्बो वगौरे वल्गना केल्या गेल्या असल्या तरी प्रत्यक्षात फक्त तीस रुग्णांची कशीबशी काळजी घेण्याइतकीच सोय या सेंटरमधे आहे आणि महापालिकेच्या नोंदीनुसार हे जम्बो केंद्र फक्त तीस खाटांसाठीचेच आहे, हे बातम्यांमधून स्पष्ट झाले.

पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूच्या वेळी तर चीड आणणारी सत्यांची मालिकाच पुढे आणलीय. आपला रुग्ण नेमका कोणत्या बेडवर आहे, हे ना नातेवाइकांना समजत ना रुग्णालयातल्या स्टाफला. त्यामुळं रुग्णाला दिलेला जेवणाचा डबा सात सात तास रुग्णापर्यंत पोहोचतच नाही आणि रुग्ण खाटेवरून घरच्यांना नातेवाइकांना मित्रांना मला भूक लागलीय, मला इथून बाहेर काढा, असं सांगत राहतो. त्याचा अचूक बेट नंबर एखाद्याच डॉक्टरला माहीत असतो. त्यामुळं या तथाकथित जम्बो सेंटरचं काम सर्वप्रथम संबंधित एजन्सीकडून काढून घ्यावं. कोविड सेंटरच्या आकारानुसार वैद्यकीय तज्ज्ञ, निमवैद्यकीय स्टाफ, जेवणाची सोय, पाणी, कँन्टीन हे सारं असल्याखेरीज फक्त राजकीय हट्टापोटी उद्घाटनं करू नयेत, नाही तर अनेक पांडुरंग या जम्बो सेंटर नावाच्या चोराच्या आळंदीचे बळी ठरतील.

पुणे श्रमिक पत्रकार संघाने सात दिवसांची मुदत दिली असून सात दिवस सर्व पश्रकार काळ्या फिती लावून काम करणार आहेत. सात दिवसात पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल, असा इशारा पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी दिला आहे.

करोनाच्या काळात करोना योद्धे म्हणून गणल्या गेलेल्या डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी किंवा पत्रकार अशा समाजघटकांना विविध कारणांमुळे रस्त्यावर तरावे लागत असेल, तर ते दुर्दैवी आहे. विविध राजकीय पक्षांनी पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबीयांना पाच पाच लाखांची मदत दिल्याच्या बातम्याही आल्या आहेत. या बातम्यांवर काय प्रतिक्रिया द्यायची….

हे पाच लाख पापक्षालनाचे समजायचे का…रायकर यांचे कुटुंबीय तसंच त्यांच्याबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत मरण अनुभवणारे जिवाभावाचे मित्र असलेले काही पत्रकार आहेत. या सर्वांनी सरकारी अनास्थेमुळे रायकर यांचा जीव गेलाय, हे स्वच्छपणे नमूद केलंय. तसं असेल तर सरकारमधे सामील असलेल्या पक्षांकडूनही निर्लज्जपणे पाच लाख दिले जातात तेव्हा त्याबद्दल अवाक व्हायला होतं. म्हणजे गेलेला माणूस परत येत नाही हे कितीही सत्य असलं तर माणूस गेल्यावर त्याची अशी किंमत लावणं कितपत योग्य आहे, असा प्रश्नही मनात येतो.  पैशाच्या जिवावर सगळं करता येतं, अशी एक मस्ती सत्तेच्या गुलामांना येत राहते. त्यामुळे अंगावर पैसे फेकले की सगळं पचतं हा एक अपसमज सर्वदूर पसरलेला आहे. तो अपसमजच आहे, हे सिद्ध करायला हवं.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER