पंढरपूर पोटनिवडणुक : राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंना मतदारांची सहानुभूती, पारडे जड

Bhagirath Bhalke - Maharastra Today

पंढरपूर : राष्ट्रवादीचे (NCP) नेते भारत भालके (Bhagirath Bhalke) यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत असून उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असून भाजपने त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना उभं केलं आहे. वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकूण 19 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी खरी लढतही भालके आणि आवताडेंमध्येच होणार आहे. अत्यंत चुरशीच्या या लढतीत कोण जिंकणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

दिवंगत भारत भालके सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले होते. २००९ मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले. २०१९ मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला. विशेष म्हणजे २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खरंतर त्यावेळी ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी भारत भालकेंनी ‘डब्ल्यू’ टर्न घेत कमळ हाती घेता-घेता अचानक राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हाती बांधलं होतं.

ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात आहे. गेल्या निवडणुकीत आवताडे यांनी अपक्ष लढूनही ५४ हजार मते मिळवली होती. तर भाजपच्या परिचारक यांनी ७६ हजार मते मिळवली होती. या दोघांची मते एकत्रित केल्यास १लाख ३० हजाराच्यावर जातात. भालके यांना ८९ हजार मते मिळाली होती. भाजप आणि आवताडेंची मते एकत्रित केल्यास भालके यांना मिळालेल्या मतांपेक्षा आवताडेंकडे आता ४० हजार मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे आकडेवारीत तरी आवताडेंचा विजय सोपा असल्याचं मानलं जात आहे. मात्र, भालके यांचं निधन झाल्याने भगीरथ यांना मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि काँग्रेसच्या मतांचीही बेगमी त्यांच्याकडे असल्याने या निवडणुकीत भगीरथ भालके यांचेच पारडे जड असल्याच राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button