पंढरपूर पोटनिवडणूक : शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार पवारांच्या भेटीला

Sharad Pawar

सोलापूर : मंगळवेढा तालुक्‍याचा समावेश असलेल्या पंढरपूर मतदारसंघात आता पोटनिवडणूक होणार आहे. त्याची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. त्या अगोदर प्रशासकीय मान्यता देऊन दुष्काळी ३५ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या शिवसेना नेत्या शैला गोडसे (Shaila Godse) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, गोडसे या पंढरपूर येथे होणाऱ्या पोटनिडणुकीसाठी इच्छुक असल्याने त्यांनी पवारांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेबाबत महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याशी स्वतः या योजनेबाबत चर्चा करून आवश्‍यक ती कार्यवाही करण्यासाठी सूचना करू, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्याची माहिती गोडसे यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्‍यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी उपसा सिंचन योजना गेल्या अनेक दिवसांपासून रखडली आहे. दुष्काळी ३५ गावांतील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या  समजल्या जाणाऱ्या या उपसा सिंचन योजनेसाठी दोन टीएमसी पाणी उपलब्ध झाले असून ५३० कोटींच्या खर्चाला २०१४ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा, उपोषण, आंदोलन करूनही ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडली आहे.

दरम्यान, पंढरपूर मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी “उपसा सिंचन योजना मार्गी लावणे, हीच खरी भारतनानांना श्रद्धांजली ठरेल” असे वक्तव्य केले होते.  याचीही आठवण आपण शरद पवार यांना करून दिली. त्यावर पवार यांनी यात स्वतः लक्ष घालण्याचे संकेत दिले, असेही शैला गोडसे यांनी नमूद केले. येत्या काही दिवसांत पंढरपूर मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. शिवसेना नेत्या गोडसे याही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी आता उपसा सिंचन योजना, पाणीप्रश्नाच्या माध्यमातून शरद पवार यांची भेट घेतल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

 बातमी पण वाचा : अडचणीत सापडलेल्या सरकारच्या मदतीसाठी पवारांची एंट्री; अजितदादांना केल्या सूचना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER