पंढरपूर पोटनिवडणूक : शिवसेना महिला जिल्हा प्रमुखाची बंडखोरी, उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra Today

सोलापूर :- पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र या सर्व रणधुमाळीत महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचे उघड झाले आहे. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे (Shaila Godse) यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्यांनी बैलगाडीत बसून येत मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सुरुवातीला येथे राष्ट्रवादी आणि भाजप अशी थेट लढत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनीसुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी अपला उमेदवार अद्याप जाहीर केले नाही. मात्र, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात धनगर समाजाच्या मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे येथे भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने आपला उमेदवार अद्याप जाहीर केला नसून येथे भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा मुलगा भगिरथ भालके यांनी उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ही निडणूक चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. उमेदावारी अर्ज दाखल केल्यानंतर जनतेची उमेदवारी म्हणून मी अर्ज भरला असल्याचे गोडसे यांनी सांगितले. तसेच, बंडखोरी करुन अर्ज भरल्यामुळे शिवसेना पक्षाने कारवाई केली तरी आपण उमेदवारीवर ठाम असल्याचेही गोडसे म्हणाल्या. गोडसे यांच्या या भूमिकेमुळे आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER